राज्य मंत्रिमंडळाचा अखेर विस्तार : १८ जणांना मंत्री पदाची शपथ

Update: 2022-08-09 07:42 GMT

 जवळपास एका महिन्यापेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळाचा शपथविधी आज पार पडला. विजयकुमार गावित, संजय राठोड, सुरेश खाडे, तानाजी सावंत, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा यांसह १८ जणांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली.

राजभवनातील दरबार हॉल येथे मंगळवारी (दि. ९) रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई व मंगलप्रभात लोढा यांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात आली.

शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, रावसाहेब दानवे, कपिल पाटील व डॉ भागवत कराड, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि इतर निमंत्रित उपस्थित होते.

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर प्रतिक्रिया दिली असून काही नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं असं एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. उशिरा का होईना महाराष्ट्राला नवं मंत्रिमंडळ मिळालं आहे. आता त्यांनी राज्याचे प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली आहे. ज्यांना क्लीनचीट मिळालेली नाही त्यांची नावं टाळता आली असती तर बरं झालं असतं असं ते म्हणाले.

संजय राठोड यांनी मंत्रीपद देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंचा असून, चित्रा वाघ यांची टीका वैयक्तिक असल्याचं गिरीश महाजन म्हणाले आहेत. आपण दुप्पट वेगाने काम करु असंही ते म्हणाले आहेत.

स्वतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News