सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे मानले आभार

Update: 2021-09-24 02:49 GMT

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल ओबीसी अध्यादेशावर स्वाक्षरी करुन ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी कालच्याच सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांना मदमस्त हत्तींची उपमा देत त्यांच्यावर जळजळीत टीका केली होती. मात्र राज्यपालांनी ओबीसी अध्यादेशावर स्वाक्षरी करताच अवघ्या 12 तासांच्या आत राऊतांनी पुन्हा अग्रलेख लिहून राज्यपालांचे आभार मानले आहेत. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.

दरम्यान ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने काढलेला सुधारित अध्यादेश आणि त्यावर आता राज्यपालांची स्वाक्षरी ही मोठी सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

सुरुवातीला ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने पाठविलेल्या अध्यादेशात असलेल्या त्रुटींचा हवाला देत राज्यपालांनी तो अध्यादेश राज्य सरकारला परत पाठविलेला होता. मात्र सुधारित अध्यादेशात राज्यपालांना वावगे काहीच आढळले नसावे. म्हणूनच त्यांनी सुधारित अध्यादेशावर तातडीने स्वाक्षरी केली. याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार मानण्यास काहीच हरकत नाही असं राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी प्रवर्गाला राजकीय आरक्षण लागू करण्यासंदर्भात हा अध्यादेश होता. पहिला अध्यादेश राज्यपालांकडे पोहोचला त्यावेळी राज्यपालांचे म्हणजे त्यांच्या राजकीय सल्लागारांचे असे म्हणणे पडले की, हा अध्यादेश परिपूर्ण नाही. आता राज्यपालांचे राजकीय सल्लागार कोण, हे फोड करून सांगण्याची गरज नाही. असा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधण्यात आला.

Tags:    

Similar News