देशमुख की परमबीर, कोण नं १? खंडणीप्रकरणात मोठा गौप्यस्फोट

Update: 2021-08-21 09:27 GMT

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सचिन वाझे याला दररोज दोन कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप मुंबईतील एका व्यावसायिकाने केला आहे. एवढेच नाही तर आपल्याकडे परमबीर सिंह आणि सचिन वाझेविरोधात पुरावे देखील आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हेच 'ते' नंबर वन वसुली मास्टर असल्याचे आता हळूहळू समोर येऊ लागले आहे. बिमल अग्रवाल नावाच्या हॉटेल व्यावसायिकाने गोरेगाव पोलिसांकडे पुराव्यांसह तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी परमबीर सिंग, सध्या तुरुंगात असलेल्या सचिन वाझेसह इतर चार जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वाझेच्या म्हणण्यानुसार 'तो' नंबर वन हा परमबीर सिंगच असल्याचं तक्रारदार अग्रवाल यांनीच पुराव्यांसह सिद्ध केल्याचा दावा केला आहे.

"२ कोटींच्या खंडणी वसुलीचे परमबीर सिंह यांचे आदेश"

लॉकडाऊनमुळे नुकसान होत आहे, हे नुकसान भरून काढण्यासाठी परमबीर सिंग यांनी सचिन वाझेला दररोज दोन कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असे वाझेनेच आपल्याला सांगितले होते असे तक्रारदार अग्रवाल यांना सांगितले आहे. तक्रारदार अग्रवाल याला एका गुन्ह्यातून सोडवण्यासाठी तसेच अग्रवाल याचे भागीदारीतील हॉटेल BOHO सुरळीत सुरू ठेवण्यासाठी वाझे हा परमबीर सिंग यांची भीती दाखवायचा, तसेच व्यावसायिकांकडून सिंग यांच्यासाठीच खंडणी वसूल करायचा, असा आरोपही करण्यात आला आहे. एकूण खंडणीच्या रकमेपैकी 75 टक्के रक्कम परमबीर सिंग स्वतः कडे ठेवतात आणि उर्वरित 25 टक्के रक्कम इतर अधिकारी वाटून घेतात, असेही वाझे याने सांगितल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे. दररोज दोन कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी वाझेने क्रिकेट बुकींना संपर्क करून परमबीर सिंग मुंबई पोलीस आयुक्त आहेत, त्यामुळे बिनधास्त दरवाजे उघडे ठेवून बुकीचा व्यवसाय सुरू ठेवण्यास सांगितले, असे तक्रारदार अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे.

परमबीर सिंह यांच्यासह इतरांवरही आरोप

अनेक तक्रारदार परमबीर सिंग आणि सचिन वाझे विरोधात पुढे आले आहेत. त्यामुले हिंमत करून आता तक्रार दिली असून परमबीर सिंग आणि वाझे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याने पोलीस सुरक्षेची मागणी अग्रवाल यांनी केली आहे. 20 ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी दाखल झालेल्या गुन्ह्यात (सीआर 971/2021) सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी पण आरोपी आहेत. कलम 384, 385 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेगावमध्ये हॉटेल चालवणाऱ्या या व्यावसायिकाने परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्याविरोधात खंडणी वसुलीची तक्रार केली आहे. आपल्याकडून ११ लाख ९२ हजार रुपये खंडणी म्हणून घेण्यात आले होते, असा आरोपा या व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत केला आहे. गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ४८ वर्षांचे हे व्यावसायिक बिल्डर आहेत, तसेच मुंबई पोलिसांची कामे कंत्राटी पद्धतीने घेतात, अशी माहितीही समोर आली आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सचिन वाझे याने आपल्याला या प्रकरणातून बाहेर काढण्याच्या बदल्यात दर महिन्याला हॉटेलचालकांकडून हप्ता वसुली करण्यास सांगितले होते, असाही आरोप त्यांनी केला आहे. वाझे आणि परमबीर सिंह यांनी आपल्याकडून रोख आणि काही मौल्यवान वस्तुंच्या रुपाने सुमारे १२ लाख रुपये उकळल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

साधारणपणे जुन २०२० च्या दरम्यान सचिन वाझे यांनी मला सांगितल्याप्रमाणे सी.आय.यु. क्राईम ब्रांच येथे ड्युटी जॉइन केली. ऑगस्ट २०२० मध्ये सचिन वाझे मला माझे मालाड येथील ऑफीसमध्ये फोन करुन भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी इतर बोलणे झाल्यावर सचिन वाझे यांनी मला सांगितले की, अनिकेतच्या दोन्ही हॉटेलमध्ये तु पार्टनर आहेस, मला माहीत आहे आणि हॉटेल नीट चालवायचे असेल तर, तुला मी सांगतो ते करावे लागेल. तु मला इथल्या हॉटेल लाईनच्या कलेक्शनची माहिती दे, जी काही माहिती लागेल ती मला द्यावी लागेल आणि जो काही मंथली (दर महिन्याचा हप्ता) ठरेल त्याप्रमाणे व्यवहार पुर्ण करावा लागेल. मी तुझे EOW चे दोन्ही पेंडींग मॅटर सी. पी. परमबीर साहेबांना सांगुन निपटवुन घेतो आणि तुझी हॉटेल पोलीसांच्या त्रासाशिवाय चालविण्याची जबाबदारी माझी आहे, असे सांगितले"

Tags:    

Similar News