भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बॅकफूटवर ;शरद पवारांवर उधळली स्तुतीसुमनं

Update: 2021-10-18 03:20 GMT

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा थेट एकेरी उल्लेख केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर मात्र, चंद्रकांत पाटील बॅकफूटवर आलेले पाहायला मिळत आहेत. त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल आदरच आहे, असे म्हणत स्तुतीसुमनं उधळली आहेत. विशेष म्हणजे पवार यांनी मुख्यमंत्री असताना 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या असे म्हणत पाटील यांनी त्यांचे तोंडभकरून कौतूक केले.

"पवार साहेब विरोधक जरी असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात अनादर नाही. आमचा बांधाला बांध नाही. उलट प्रमोद महाजन आम्हाला सांगायचे. मुख्यमंत्री होताना पवार साहेबांनी 40 गोष्टी लिहून काढल्या. त्यातल्या 38 पूर्ण केल्या," असे पाटील म्हणाले.

तसेच "माझ्याकडून अनावधानाने जो उल्लेख झालेला आहे, त्याबद्दल काही लोक बोलत आहेत. हे राष्ट्रवादीच्या पे रोलवर आहेत. त्यांना तसं म्हणावंच लागतं. माझ्या मनात पवार साहेबांबद्दल आदरच आहे.आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने जेष्ठांचा अनादर करायला शिकवलेले नाही," असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं.

सांगलीमध्ये एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी शब्दात टीका केली होती. त्यानंतर पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली आता चंद्रकांत पाटील बॅकफूटवर आलेले दिसत आहे.

Tags:    

Similar News