शिवसेनेच्या अब्दुल सत्तारांनी मदत केली, भाजप आमदाराचा दावा

Update: 2022-06-11 12:25 GMT

चुरशीच्या ठरलेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला आहे. पण यामध्ये अनेक अपक्ष आमदारांच्या मतांची फाटाफूट झाल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार संतोष दानवे यांनी एक मोठा दावा केला आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली. त्यांनी केलेल्या मदतीमुळे आम्हाला राज्यसभा निवडणुकीत खूप फायदा झाला, असा गौप्यस्फोट भाजपचे भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी यांनी केला आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. एवढेच नाही तर राज्यसभेच्या निवडणुकीत सत्तार यांनी भाजपला जशी मदत केली तशीच मदत ते विधानपरिषद निवडणुकीत पुन्हा करतील, अशी अपेक्षा देखील संतोष दानवे यांनी व्यक्त केली आहे.

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात मतदान करणाऱ्या गद्दारांची यादी आमच्याकडे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना अपक्ष आमदार गद्दार नसून राऊत यांच्याकडे असलेल्या गद्दारांच्या यादीत अब्दुल सत्तार एक नंबरवर असायला हवेत असा टोलाही आमदार संतोष दानवे यांनी लगावला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाआधी भाजपचे आमदार आणि रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करणार असल्याचे सत्तार यांनी म्हटलं होतं. त्यावर उत्तर देतांना संतोष दानवे यांनी सत्तार यांच्यावरच हा आरोप केला आहे. "अब्दुल सत्तार हे ज्या पक्षात आहेत ते त्या पक्षात कधीच नसतात. सत्तार हे ज्या पक्षाच्या पदावर असतात ते कधीच त्या पक्षासोबत नसतात, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवुन दिलं" असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.

Tags:    

Similar News