नरेंद्र मोदी यांच्या चाहत्याच्या घरी केजरीवाल यांचे जेवण?

वर्षाअखेरीत होणाऱ्या निवडणूकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांनी एका रिक्षाचालकाच्या घरी जेवण करण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

Update: 2022-10-01 01:26 GMT

डिसेंबर महिन्यात गुजरातमध्ये विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी चांगलीच कंबर कसली आहे. अरविंद केजरीवाल यांनी गेल्या आठवड्यात रिक्षाचालकाच्या घरी जेवण केले होते. मात्र त्या रिक्षाचालकाने आपण नरेंद्र मोदी यांचा चाहता असल्याचे वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरून भाजपने जोरदार टीका केली आहे.

12 सप्टेंबर रोजी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल हे रिक्षा चालक असलेल्या विक्रम दंतांनी यांच्या घरी जेवण केले. मात्र त्यानंतर शुक्रवारी विक्रम दंतानी यांनी आपण नरेंद्र मोदी यांचा चाहता असल्याचे वक्तव्य केले. तसेच यावेळी विक्रम दंतानी म्हणाले की, मी भाजपसोबत आहे. मी भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातो. माझा सदैव भाजपला पाठींबा आहे. मी नरेंद्र मोदी यांचा मोठा चाहता आहे. तसेच मी सर्व चांगल्या गोष्टींचा चाहता असल्याचा दावा केला आहे.. त्यामुळे भाजपने आपवर सडकून टीका केली आहे.

रिक्षा चालक असलेल्या विक्रम दंतानी यांनी शुक्रवारी म्हटले की, मला टाउनहॉल येथे अरविंद केजरीवाल येणार असल्याची कल्पना नव्हती. मला रिक्षाचालकांची मीटिंग असल्याचे सांगण्यात आल्याचे वक्तव्यही विक्रम दंतानी यांनी केले. यावरून भाजप नेते अल्पेश पटेल यांनी म्हटले की, हे आपने केलेले नाटक आहे. त्यामुळेच आप गुजरातच्या जनतेच्या मनात नाही.

यावरून आपचे नेते मनोज सेठिया यांनी भाजपवर पलटवार केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, हा भाजपने अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा केलेला प्रयत्न आहे. गेली 27 वर्ष भाजप गुजरातमध्ये हेच करत आहे. कारण 12 सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांचा टाऊनहॉलमध्ये कार्यक्रम होता. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी रिक्षाचालकांशी चर्चा केली. यावेळी विक्रम दंतानी म्हणाले की, मी तुमचा मोठा चाहता आहे. तुम्ही पंजाबमध्ये एका रिक्षाचालकाच्या घरी जेवणासाठी गेला होता. तुम्ही माझ्या घरी जेवणासाठी याल का? असा सवाल केला. त्यावर अखेर केजरीवाल यांनी होकार दिला. मात्र विक्रम दंतानी यांनी आता भुमिका बदलली आहे. हे भाजपचे नियोजनबध्द काम असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

Tags:    

Similar News