अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणूक : अखेर काँग्रेसने दिला शिवसेनेला पाठींबा

Update: 2022-10-05 06:21 GMT

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठींबा दिला होता. मात्र काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात होती. परंतू काँग्रेसचा शिवसेनेच्या ऋुतूजा लटके यांना पाठींबा देणार असल्याचे नाना पटोले जाहीर केले.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी शिवसेनेने रमेश लटके यांच्या पत्नी ऋुतूजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादीने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले. मात्र काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली नव्हती. त्यानंतर अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जातीयवादी आणि धर्मांत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी महाविकास आघाडी स्थापन झाली. राज्यात अडीच वर्षे या महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारने शेतकरी कर्जमाफीसारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात देशात सर्वोत्तम काम केले. पण सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाने ईडी सीबीआय या केंद्रीय संस्थाचा दुरुपयोग करून शिवसेनेच्या आमदारांना फोडून महाविकास आघाडी सरकार पाडले. महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न भाजपने केले ते यशस्वी झाले नाहीत, म्हणून त्यांनी शिवसेना पक्ष फोडला. भारतीय जनता पक्षाविरोधातील या लढाईत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार नसून शिवसेना पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करतील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

Tags:    

Similar News