"तारतम्य पाळलं पाहिजे" अजित पवारांनी फडणवीसांना सुनावले

Update: 2022-01-15 13:06 GMT

५ राज्यांमधील निवडणुकांवरुन सध्या महाराष्ट्रातील राजकारण देखील तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ३ राज्यांच्या निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे. यावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार खडाजंगी सध्या सुरू आहे. " नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, तो पक्ष केवळ पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष आहे. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं !"

या शब्दात फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. त्या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. शरद पवार यांचे कार्य संपूर्ण देशाला माहिती आहे, त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना नवीन पिढीने तारतम्य पाळले पाहिजे, या शब्दात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल किंवा सुप्रिया सुळे उत्तर देतील. पण शरद पवार यांची उंची मोठी आहे, त्यांचे राष्ट्रीय पातळीवरील काम आणि त्यांच्याबद्दल लोकांमध्ये असलेली आदराची भावना या सगळ्यांचा विचार करूनच नवीन पीढीने बोललं पाहिजे, तारतम्य पाळलं पाहिजे, या शब्दात अजित पवार यांनी फडणवीस यांना सुनावले आहे.

सध्या ५ राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने गोवा आणि उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यात राष्ट्रवादीची काँग्रेस, तृणमूल काँग्रेस सोबत बोलणी सुरू आहे. तर तिकडे उ. प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसने सपासोबत आघाडी केली आहे. मणिपूरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी ५ जागांवर एकत्र लढणार आहेत. त्यामुळे यंदाच्या ५ राज्यांच्या निवडणुकांमधील आरोप – प्रत्यारोपांचा सामना महाराष्ट्रातही रंगणार आहे.

Tags:    

Similar News