"क्रांती रेडकरच्या बहिणीवर ड्रग्जची केस", नवाब मलिकांचा नवा हल्ला

Update: 2021-11-08 07:18 GMT

Ncb चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर दररोज नवनवीन आरोप करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता आणखी एक नवीन खुलासा केला आहे. मलिक यांनी सोमवारी पुन्हा एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची एक केस सध्या प्रलंबित आहे, समीर वानखेडे यांनी यावर उत्तर द्यावे असेही मलिक यांनी म्हटले आहे. क्रांती रेडकर यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट करुन राईस आणि दाल मखनीचा फोटो शेअर केला होता आणि आम्ही १९० रुपयांना दाल मखनी ऑर्डर केली होती, असे म्हणत मलिक यांना टोला लगावला होता. तसेच त्याआधीही क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या नवाब मलिकांवर जोरदार टीका केली होती.

मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये काही स्क्रीनशॉट्सही जोडले आहेत. तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "समीर दाऊद वानखेडे तुम्ही मेव्हणी हर्षदा दीनानाथ रेडकर ह्या ड्रग्जच्या व्यवसायात आहेत का? समीर वानखेडे यांनी उत्तर दिलेच पाहिजे कारण त्यांची केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. मी पुरावे देखील देत आहे" असे सांगत त्यांनी काही स्क्रीन शॉट्सही यामध्ये जोडले आहेत.

समीर वानखेडे यांचे म्हणणे काय?

मलिक यांच्या या ट्विटला समीर वानखेडे यांनी उत्तर दिले आहे. "हर्षदा रेडकरवर ड्रग्जची केस २००८मध्ये झाली आहे, त्यावेळी मी नोकरीमध्ये देखील नव्हतो. क्रांती रेडकरशी माझे लग्न २०१७मध्ये झाले. त्यामुळे या केसशी माझा संबंध कसा काय असू शकतो?" असा सवाल वानखेडे यांनी विचारल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. पण मलिक यांनी समीर वानखेडेंवर सुरू केलेल्या आरोप सत्रानंतर समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाची चौकशी काढून घेण्यात आली आहे. त्यानंतर आता समीर वानखेडे यांना मलिक यांनी आणखी एक मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

Tags:    

Similar News