गोव्यात काँग्रेस नेत्यांची भाजप जोडो यात्रा ;आठ आमदारांनी सोडला पक्ष

Update: 2022-09-14 08:09 GMT

केंद्रातील भाजप सरकारला तगडं आव्हान देत काँग्रेसला देशव्यापी उभारी देण्यासाठी 'भारत जोडो यात्रा' अभियानाची यशस्वी सुरूवात झाली असताना गोव्यात मात्र कॉंग्रेसचा खिंडार पाडत ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. मागील आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू येथून या यात्रेची सुरूवात झाली. दुसऱ्या आठवड्यात भारत जोडो यात्रा केरळात असून लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

भारत जोडोने कॉंग्रेसला उर्जितावस्था मिळत असल्याचे दिसत असतानाचा आता काँग्रेसला एक धक्का बसला आहे. गोव्यातील काँग्रेसचे ८ आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत. या आठ आमदारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली आहे. गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. त्यापैकी मायकल लोबो, दिगंबर कामत, दियालया लोबो, राजेश फळदेसाई, रदाल्फ फर्नांडिस, अलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर हे आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे गोवा भाजपाचे अध्यक्ष सदानंद तानवडे यांनी संकेत दिले आहेत.

गेल्या काही वर्षात भाजपनं मध्यप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ राबवून सत्ता हस्तगत केली आहे. राजस्थान आणि छत्तीसगढमधे भाजपला अद्यापही यश मिळाले नाही. गोव्यात सत्तेत असूनही भाजपनं कॉंग्रेसला खिंडार पाडलं आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मायकल लोबो यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मायकल लोबो, दिगंबर कामत आणि आठ आमदार जुलै महिन्यातच भाजपात प्रवेश करणार होते.

तेव्हा, काँग्रेसने कामत आणि लोबो यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. तसेच, काँग्रेसने लोबो यांची विरोधीपक्ष नेते पदावरून हकालपट्टी देखील केली होती. आता आठ आमदारांच्या समावेशानं गोवा भाजप पुन्हा एकदा शक्तीशाली पक्ष गोव्यात ठरणार आहे.

Tags:    

Similar News