5 State Elections : गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांबाबत पक्षांना स्पष्टीकरण द्यावे लागणार

Update: 2022-01-08 10:45 GMT

देशातील राजकीय वातावरण ज्या ५ राज्यांच्या निवडणुकांभोवती सध्या फिरत आहे, त्या निवडणुकांची घोषणा अखेर करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकांची घोषणा केली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. पण निवडणूक आयोगाने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे.

पण यावेळी निवडणूक आयोगाने सुधारणा करत एक महत्वाचा नियम राजकीय पक्षांना घालून दिला आहे. निवडणुकीसाठी जे उमेदवार आपला अर्ज दाखल करतात, त्यांना आपली सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. त्यानुसार उमेदवाराला आपल्यावर दाखल गुन्ह्यांची माहितीही द्यावी लागते. पण आता सर्व राजकीय पक्षांना आपापल्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती आपल्या वेबसाईटवर जाहीर करावी लागणार आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला उमेदवारी का दिली याचे कारण देखील राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे निर्णय

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर झालेले लसीकरण लक्षात घेता, निवडणूक घेण्याचे कर्तव्य पार पाडण्याचा निर्धार यावेळी निवडणूक आयुक्तांनी बोलून दाखवला. या पार्श्वभूमीवर त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. प्रत्येक मतदार केंद्रावर केवळ १२५० मतदार मतदान करतील असा निर्णय़ घेण्यात आला आहे. तसेच सर्व मतदान केंद्रांच्या संख्येत १६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचे सर्व कर्मचारी आणि बंदोबस्तावरील पोलिसांना प्राधान्याने बुस्टर डोस देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करताना होणारी गर्दी लक्षात घेता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी एक स्वतंत्र मतदान केंद्र असेल असाही निर्णय घेण्यात आला आहे.


Full View

Tags:    

Similar News