गोगावलेंचा अजून राजीनामा का घेतला नाही ?

Update: 2026-01-19 15:44 GMT

महायुती सरकारचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा आणि पुतण्यानं केलेल्या मारहाणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं कठोर शब्दात रायगड पोलिसांना जाब विचारलाय. या दोघांनाही अजून अटक का केली नाही ? असा थेट संतप्त सवाल न्यायालयानं विचारलाय.

२ डिसेंबर २०२५ रोजी महाड नगरपालिकेचं मतदान होतं. यावेळी स्नेहल जगताप समर्थक सुशांत जाबरेंच्या वाहनांची तोडफोड ही कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश याने केली होती. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारीही झाली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात पोलिसांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला होता. याप्रकऱणाच्या सुनावणी वेळी कोर्टानं रायगड पोलिसांना चांगलंच सुनावलंय.

गुन्हा दाखल झाल्यानंतर विकास गोगावले आणि महेश गोगावले यांचे जामीन अर्ज अनेकदा न्यायालयानं फेटाळले. दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही विकास आणि महेश यांना अटक करण्यात आलेली नाही. याच मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय. “ते कॅबिनेट मंत्र्यांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांना संरक्षण दिलं जातंय का ? पोलिसांवर राजकीय दबाव आहे का ?,” असे थेट प्रश्नच न्यायालयानं उपस्थित केले आहेत.

दरम्यान, कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांची या प्रकरणात चौकशी झालीय का ? त्यांचा मुलगा आरोपी आहे, त्याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळलाय, अशा परिस्थितीत भरत गोगावले अजूनही कॅबिनेटमध्ये कसे आहेत ? त्यांनी राजीनामा का दिला नाही ? २१ डिसेंबर रोजी विकास गोगावलेंचा राजीनामा फेटाळलाय, तरीही त्यांना अजून अटक का केली नाही ? मंत्र्यांचे सर्व नातेवईक फरार कसे ? फरार असूनही त्यांचे जामीनासाठी न्यायालयात अर्ज कसे येतात ? हे गंभीर असून तातडीनं मुख्यमंत्र्यांशी बोलून मंत्र्यांचा राजीनामा घ्या ! अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं याप्रकरणावर संताप व्यक्त केलाय.

श्रीयश जगताप यांच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे प्रश्न उपस्थित केले आहेत. याचिकाकर्ते श्रीयश जगताप यांना मात्र २२ जानेवारी पर्यंत अटकेपासून तात्पुरता दिलासा न्यायालयानं दिलाय. मात्र, उर्वरित आरोपी – दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते –अद्याप फरार असून, त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळेच १७ जानेवारी तारखेला दिलेल्या आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने रायगड पोलिसांना चांगलंच सुनावलंय. या प्रकरणात तात्काळ आणि निष्पक्ष कारवाई करा, असे स्पष्ट आदेशच न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्री भरत गोगावले यांचा राजीनामा घेणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Tags:    

Similar News