लाडांच्या चार्टर्ड विमानाने प्रवास, चित्रा वाघांचे ‘ते’ ट्विट डिलीट !

Traveling on Prasad Lad's chartered plane, Chitra Wagh's 'that' tweet deleted!

Update: 2025-12-08 07:57 GMT

हवाई प्रवासासाठी पैसे खर्चूनही इंडिगोच्या आडमूठ्या धोरणामुळं प्रवाशांना देशभरात प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. तर, दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची स्वतःचीच विमानं असल्यानं त्यांचा प्रवास सुखकर होतोय. मुंबईतून नागपूरला पोहोचल्यानंतर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी ट्विट करुन कळवलं...आणि त्यानंतर तेच ट्विट डिलीट करण्यात आलं...




 


विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईतून भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, आमदार चित्रा वाघ, आमदार सुमित वानखेडे हे भाजपचेच आमदार प्रसाद लाड यांच्या चार्टर्ड विमानानं नागपूरमध्ये दुपारी पावणे दोनच्या सुमारास पोहोचले...याची माहिती आमदार चित्रा वाघ यांनीच फोटोसह ट्विट करुन दिली. त्यामुळं प्रसाद लाड हे चार्टर्ड विमानाचे मालक असल्याची नोंदच आमदार चित्रा वाघ यांनी या ट्विटमधून केली. मग नेटिझन्सनी चित्रा वाघ यांना ट्रोल करायला सुरुवात केली. त्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांचं चार्टर्ड विमानही आहे का ? असा थेट सवाल नेटिझन्सनी विचारायला सुरुवात केली. आता या चार्टर्ड विमानाचे मालक प्रसाद लाड हे अडचणीत येऊ नये म्हणून मग चित्रा वाघ यांनी तात्काळ ते ट्विट डिलीटही केल्याची चर्चा सुरु झालीय...




देशात सध्या इंडिगो कंपनीनं अचानक आपल्या हजारो फ्लाईट्स रद्द केल्या, त्यामुळं त्रस्त प्रवाशांनी आपला संताप मिळेल त्या माध्यमातून व्यक्त केला. यापार्श्वभूमीवर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी जातांना अनेक नेत्यांना अडचणी येत होत्या. तर दुसरीकडे आमदार प्रसाद लाड यांच्या मालकीच्या चार्टर्ड विमानानं सत्ताधारी पक्षाच्या आमदार चित्रा वाघ, आमदार प्रवीण दरेकर, आमदार सुमित वानखेडे हे नागपूरमध्ये सुखरुप पोहोचले. यासंदर्भातलं चित्रा वाघ यांचं ते ट्विट अपलोड झाल्यानंतर त्यावर नेटिझन्सच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आता हे सगळं पाहिल्यानंतर मात्र, ट्विट डिलीट करण्याशिवाय गत्यंतर नाही, हे लक्षात आल्यानंतर आमदार चित्रा वाघ यांनी तातडीनं ते डिलीट केलं...त्याचवेळी काही नेटिझन्सनी या ट्विटचे फोटो, स्क्रीनशॉर्ट काढून ठेवले होते. आता तेच व्हायरल होत आहेत...




 हजारो कोटी रुपये खर्चून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग तयार करण्यात आलाय... अवघ्या ७ तासांमध्ये हे अंतर मोठ्या गाड्या सहज पार करु शकतात. तशा गाड्या आमदार-खासदार किंवा मोठ्या नेत्यांकडे असतातच. अशा परिस्थितीत या महामार्गावरुन जाणं आर्थिकदृष्ट्याही परवडणारं असतांना विमानासाठीच हे नेते आग्रही का असतात, हे मात्र न समजणारं कोडं आहे...

Tags:    

Similar News