मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे संशयाच्या भोवऱ्यात ?

युवासेनेकडून चौकशीची मागणी

Update: 2025-10-19 14:05 GMT

पुणे : लंडन इथल्या प्रेम बिऱ्हाडे या बौद्ध तरुणानं पुण्यातल्या मॉडर्न महाविद्यालयावर आरोप केल्यानंतर हे महाविद्यालय चर्चेत आलंय. आता याच महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी संस्थाचालकाच्या नातेवाईकाची बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीनं नियुक्ती झाल्याचा गंभीर आरोप युवासेनेच्या वतीने दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे १९ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आला होता. उच्च शिक्षण संचालकांकडे यासंदर्भात युवासेनेनं तक्रार करत चौकशीची मागणीही केली होती. 

युवा सेनेचे नेमके आरोप काय ?

पुणे शहरातील शिवाजीनगर इथल्या मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राध्यापक, डॉ. निवेदिता गजानन एकबोटे यांची प्राचार्यपदी झालेली नियुक्तीच बेकायदेशीर व नियमबाह्य झाल्याचा गंभीर आरोप युवा सेनेचे (उबाठा) राज्य सह-सचिव कल्पेश यादव यांनी दोन महिन्यांपूर्वीच लेखी तक्रारीद्वारे प्रशासनाकडे केला होता. डॉ. निवेदिता एकबोटे या मागील काही वर्षांपासून सामाजिक-राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यामुळं प्राचार्य पदासाठी आवश्यक असलेला अनुभव त्यांनी कसा आणि कधी घेतला ? असा थेट प्रश्नच कल्पेश यादव यांनी उपस्थित केला होता. डॉ. निवेदिता एकबोटे यांनी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात नोकरी केलेली नाही, तरीही त्यांची नियुक्ती कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या थेट प्राचार्यपदी होणं हे संशयास्पद असल्याचा आरोपही कल्पेश यादव यांनी केला आहे. शिवाय एका अनुदानित महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी कधीही अनुदानित महाविद्यालयात काम न केलेल्या व्यक्तीची म्हणजेच डॉ. निवेदिता एकबोटे यांची नियुक्ती होणेही संशयास्पद असून या सर्व घटनेची उच्च शिक्षण विभागाकडून चौकशी कऱण्याची मागणी कल्पेश यादव यांनी लेखी पत्राद्वारे केली होती.


 






 



महाराष्ट्रात मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. लाखो पात्र उमेदवार प्राध्यापक भरतीची वाट पाहत आहेत. अनेक उमेदवारांचं आयुष्य हे तासिका तत्त्वावर काम करण्यातचं संपेल, अशी विदारक स्थिती असल्याचं कल्पेश यादव यांनी म्हटलंय. NET-SE, PhD नाही तर पोस्ट डॉक्टरेट करुनही हुशार उमेदवारांना अद्याप नोकरी नाही. प्राध्यापक भरती तात्काळ करा, तासिका तत्त्वावर काम करणाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची बेरोजगार उमेदवारांची सातत्यानं पुढं येणारी मागणी आहे.

तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या पात्र उमेदवारांच्या नातेवाईकांच्या संस्था नाहीत, त्यामुळं त्यांना प्राध्यापक पदावर रुजू होता येत नाही. मात्र, पुण्यातील बहुतांश संस्था चालकांनी आपल्या नातेवाईकांना विद्यापीठाच्या कुलगुरू पदापर्यंत बसवले आहे. तीच परंपरा आता मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य पदासाठी चालवली जात आहे, असा थेट आरोपही कल्पेश यादव यांनी केलाय.

प्राचार्य पदावर नियुक्तीसाठी 15 वर्षांचा प्राध्यापक पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मात्र, हा अनुभव पूर्णवेळ राजकारणात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीने केव्हा घेतला हा संशोधनाचा विषय आहे. एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्य पदासाठी किती अर्ज आले ? त्या अर्जांची छाननी कोणी केली ? प्राचार्य नियुक्तीसाठी आलेल्या समितीमध्ये विद्यापीठाकडून कोणाचा समावेश होता ? आणि पुणे विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून कोण आले होते ? या सर्वांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कारण लाखो बेरोजगार नोकरीच्या प्रतिक्षेत असताना केवळ आपल्या नातेवाईकांना शिक्षण संस्थेच्या महत्त्वाच्या पदांवर बसवण्याचा घाट घालणे कितपत योग्य आहे ? असा सवालही कल्पेश यादव यांनी उपस्थित केलाय. 

Tags:    

Similar News