विमा करारातील 5 महत्त्वाची वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का?
विमा करार इतर सामान्य करारांपेक्षा कसा वेगळा आहे? जाणून घ्या;
आर्थिक नियोजनात विम्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. व्यक्तीच्या जोखीम व्यवस्थापनात तो एक सुरक्षित छत्री ठरतो. मात्र विमा हा केवळ कागदी करार नसून, त्यामध्ये काही विशेष कायदेशीर आणि आर्थिक वैशिष्ट्ये आहेत. याच वैशिष्ट्यांमुळे विमा करार इतर सामान्य करारांपेक्षा वेगळा ठरतो.
१. अत्यंत विश्वासाचा करार
विमा कराराला “अत्यंत विश्वासाचा करार” असे म्हटले जाते. यामध्ये विमाधारकाने स्वतःबद्दल आणि संबंधित जोखमीबद्दल अचूक व संपूर्ण माहिती द्यावी लागते. आरोग्य, व्यवसाय, सवयी यासंबंधी चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास भविष्यात दावे नाकारले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे विमा कंपनीनेही अटी-शर्ती स्पष्ट सांगणे गरजेचे आहे.
२. भरपाईचा सिद्धांत
विम्याचा मुख्य उद्देश नुकसान भरून काढणे हा आहे. विमाधारकास झालेल्या तोट्याचीच भरपाई मिळते, त्यातून नफा होत नाही. उदाहरणार्थ, वाहन अपघात विम्यात वाहन दुरुस्तीचा प्रत्यक्ष खर्चच मिळतो. यामुळे विमा कराराला न्याय्यतेचा आणि पारदर्शकतेचा आधार मिळतो.
३. विमा हितसंबंध आवश्यक
विमा घेणाऱ्याचा त्या व्यक्ती, मालमत्ता किंवा आरोग्याशी प्रत्यक्ष आर्थिक हितसंबंध असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती स्वतःच्या घराचा किंवा स्वतःच्या जीवनाचा विमा घेऊ शकते, पण इतर कुणाच्या मालमत्तेचा विमा घेता येत नाही. हे वैशिष्ट्य कराराला कायदेशीर आणि नैतिक वैधता प्रदान करते.
४. प्रतिस्थापनाचा सिद्धांत
भरपाई मिळाल्यानंतर विमा कंपनीला त्या मालमत्तेवरील हक्क मिळतात. उदाहरणार्थ, विमा कंपनीने अपघातग्रस्त गाडीचा संपूर्ण दावा भरला असल्यास त्या गाडीच्या अवशेषांवरील हक्क विमा कंपनीकडे राहतात. यामुळे दुबार फायदा घेण्याची शक्यता टळते.
५. योगायोगावर आधारित करार
विमा करार हा अनिश्चित घटनेवर आधारित असतो. घटना घडली तरच विमाधारकाला लाभ मिळतो. उदाहरणार्थ, जीवन विम्यात मृत्यू झाल्यासच ठरलेली रक्कम कुटुंबाला मिळते. जर घटना घडली नाही तर प्रीमियम हा कंपनीकडेच राहतो.