पंतप्रधान आवास योजने अंतर्गत तळीये गावाचं होणार पुनर्वसन ; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे आश्वासन

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यात त्यांनी दरडग्रस्त तळीये गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी तळीये गावाचं पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पुनर्वसन करणार असल्याचे आश्वासन दिले.

Update: 2021-07-25 09:55 GMT

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यात त्यांनी दरडग्रस्त तळीये गावाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर हे देखील उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त मृतांचा आकडा ६० वर पोहचला, तर महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील ४९ मृतदेह आतापर्यंत आढळले आहेत.




आज रविवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील तळीये गावाची पाहणी केली. तेथील बाधितांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. त्यांच्याशी चर्चा करताना "गावात पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून देण्यात येतील. तसेच स्थानिक नागरीक सांगतील तेथेच पुनर्वसन केले जाईल. केंद्र सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करेल," असं आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिलं.

तळीये गावाचं म्हाडा अंतर्गत पुनर्वसन- जितेंद्र आव्हाड

शनिवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील दरडग्रस्त तळीये गावाची पाहणी केली होती. त्यांच्या या पाहणी दौऱ्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील दुर्घटनाग्रस्त तळीये गाव आता म्हाडा उभारणार असल्याची घोषणा केली होती. राज्य आणि केंद् या दोन्ही सरकारांकडून तळीये गावाचं पुनर्वसन करण्याची घोषणा जरी करण्यात आली असली तरी ती सर्वात आधी कोण अंमलात आणतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


Tags:    

Similar News