तुम्ही चोऱ्या केल्या की यंत्रणा तुमच्या मागे लागणारच- प्रकाश आंबेडकर

Update: 2022-03-09 14:40 GMT

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरु आहे. त्यातच वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उध्दव ठाकरे हे नावाला मुख्यमंत्री आहेत, कर्तृत्वाने नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.

गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर भाजप आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. त्यातच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्यापाठोपाठ अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना उध्दव ठाकरे हे फक्त नावाला मुख्यमंत्री आहेत. कर्तृत्वाने नाही, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, आंदोलन एवढं खेचू नका. त्यात तुम्हीच अडचणीत येऊ शकता. पण हा सल्ला एसटी कर्मचाऱ्यांनी कला नाही. तर उपटसुंभ नेत्यांच्या पाठीमागे लागल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची फसगत झाल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तूत फेरफार केला जाऊ शकतं. त्यामुळे फॉरेन्सिक प्रयोगशाळेतून जोपर्यंत सत्य असल्याचे समोर येत नाही. तोपर्यंत यावर कोणीही कमेंट करू नये, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

चोरांच्या सरकारमध्ये चोरी केल्यामुळे पोलिस तुमच्या मागे लागणारच. चोरी करणे हा गुन्हा आहे. तो गुन्हा ओलांडला की एजन्सी तुमच्या मागे लागणारच. त्या तपासासाठीच अपॉइंट केल्या जातात. मग तुम्ही चोऱ्या केल्याच का? असा सवाल चौकशी सुरू असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रकाश आंबेडकर यांनी सवाल केला.

Tags:    

Similar News