जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त परिसंवाद
संवेदनशीलता ते संकल्प : शोषणाविरोधात लढा;
मुंबई दि. २९ जुलै,
संयुक्त राष्ट्रसंघाने ३० जुलै हा जागतिक मानवी तस्करी विरोधी दिन म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने मानवी तस्करी या समस्येबाबत चर्चा व्हावी, जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने “संवेदनशीलता ते संकल्प: शोषणाविरोधात लढा” या राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन बुधवार दिनांक ३० जुलै २०२५ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे केले आहे. आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांच्या संकल्पलेतून होणाऱ्या या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोर्हे, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मार्गदर्शन करणार आहेत.
जगभरातील अनेक देश मानवी तस्करी या सर्वाधिक वेगाने वाढणार्या गुन्हेगारी विरोधात लढा देत आहेत. भारतात ही मानवी तस्करी हा चिंतेचा विषय आहे. मानवी तस्करीचे प्रकार, तस्करी ओळखणे, तस्करी रोखण्यासाठी संबंधित घटकांना प्रशिक्षण, यंत्रणातील समन्वय, पीडितांना मदत, न्यायलयीन सहाय्य आणि त्यांचे पुनर्वसन तसेच जागरूकता मोहिम आदी विषयांवर देशभरातील तज्ञ व्यक्ती या परिसंवादात आपले विचार मांडणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील परिसंवादात अवैध मानवी तस्करी पथकात कार्यरत पोलिस, रेल्वे पोलिस दल, कायदेतज्ज्ञ, सरकारी वकील, महिला व बाल संरक्षण अधिकारी, परिवहन क्षेत्र, समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी, तांत्रिक तज्ज्ञ यात सहभागी होणार आहेत.
पहिल्या चर्चासत्रात मानवी तस्करीविरोधी लढ्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित माँडेल्स, साधने, नवीन कल्पना आणि उपाय यावर चर्चा होणार आहे. यामधे श्री ज्ञानेश्वर मुळये, माजी सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आय़ोग, स्टँक टेक्नोलाँजीचे संस्थापक श्री अतुल राय, प्रेरणा संस्थेच्या रश्मी टेलर , सायबरपीस फाउँडेशनचे इरफान सिद्धावतम सहभागी होणार असून याचे सुत्रसंचालन प्रयास संस्थेच्या शँराँन मेनेझेस करणार आहेत. यात तस्करी रोखण्यासाठी आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध कार्यपद्धती, तंत्रज्ञानावर आधारित मॉडेल्सबाबत तज्ञ व्यक्ती जगभरातील अनुभव सांगतील.
प्रवासा दरम्यान आणि ऑनलाइन माध्यमाद्वारे मानवी तस्करी विरोधात कृती आराखडा या दुसर्या सत्रात होणारी चर्चा ही, चर्चा रेल्वे स्थानके, महामार्ग, बस स्थानके आणि फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, एक्स यांसारख्या ऑनलाइन जागांवर तस्करी कशी ओळखायची आणि ती कशी थांबवायची यावर आहे. यात परिवहन, रेल्वे, डिजिटल व्यासपीठ, स्वयंसेवी संस्था, कायदेशीर तज्ञ सद्यस्थिती, सुधारणा, समन्वय यावर आपले विचार मांडतील.
या राष्ट्रीय परिसंवादाच्या आयोजनाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर म्हणाल्या, मानवी तस्करी या गुन्ह्याचे अनेक असून त्याबद्दल माहिती नसल्याने अनेक महिला, मुल आणि पुरुषही या जाळ्यात अडकतात. गरीबी, फसवणूक, नोकरीच आमिष, झटपट पैशाच आमिष अशा गोष्टींमुळे सामान्य लोक यात फसतात. आँनलाईन माध्यमातून ही फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत.मानवी तस्करी ही एक संघटित गुन्हेगारी आहे आणि त्याचा सामना आपणही एकत्रितपणे केला पाहिजे. या समस्येवर मात करण्यासाठी एकत्रित काय करता येईल, ठाम पावलं कशी उचलता येतील याविषयी परिसंवादात चर्चा होणार आहे. तस्करी विरोधात अनेक कठोर कायदे आहेत मात्र त्याची अमंलबजावणी करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. समाज म्हणून प्रत्येकजण आपल्या जबाबदारीबाबत सजग राहिलो तर आपल्या देशातील नागरिकांना आपण या दुष्टचक्रापासून सुरक्षित करु शकतो.