अत्यावश्यक सेवा वगळता सामान्यांसाठी तूर्तास लोकलची दारं बंदच

Update: 2020-08-11 01:50 GMT

लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलेली लोकल वाहतूक सामान्यांसाठी तूर्तास तरी बंद राहणार आहे असे आता स्पष्ट झाले आहे. अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल वाहतूक सुरू केली आहे. पण सामान्य मुंबईकरांना सध्या तरी लोकलमध्ये प्रवेश मिळणार नाहीये.

लोकल सेवा पूर्ण क्षमतेने आणि सगळ्यांसाठी कधी सुरू होईल याची माहिती रेल्वे तर्फे देण्यात आलेला नाही. सोमवारी सोशल मीडियावर रेल्वेच्या एका पत्राच्या आधारे लोकल आणि मेल एक्स्प्रेस सेवा 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार असा मेसेज व्हायरल झाला होता. त्यावर रेल्वेतर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

हे ही वाचा...

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये असा साजरा होणार स्वातंत्र्य दिन

राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 68 टक्क्यांवर

मराठा आरक्षणाविरोधात भाजपचे राजकीय षडयंत्र : अशोक चव्हाण

यात रेल्वेने म्हटलेले आहे की, सोशल मीडियावरील बातमी चुकीची असून रेल्वेतर्फे सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्या सुरूच राहणार आहेत. तसंच रेल्वेने अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यासंदर्भात कोणतेही नवीन परिपत्रक काढले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे मध्ये रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनीही स्पष्टीकरण देत 11 मे रोजी रेल्वेनं विशेष गाड्या वगळता इतर सर्व प्रवासी गाड्या पुढील सूचनेपर्यंत रद्द केल्याचे आधीच जाहीर केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विशेष गाड्या वगळता लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस, लोकल वाहतूक सध्या तरी सुरू होऊ शकणार नाहीये.

मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर लोकल वाहतुकीसह लांब पल्ल्याच्या गाड्या रेल्वेने बंद केल्या होत्या. त्यानंतर श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आल्या. तसंच काही विशेष रेल्वे गाड्याही रेल्वेतर्फे सुरू करण्यात आल्या आहेत. एकीकडे सरकारने अनलॉक अंतर्गत विविध उपक्रमांना परवानगी दिलेली आहे. पण कर्मचाऱ्यांना ऑफिसपर्यंत पोहोचणे कठीण जात असल्याने लोकल वाहतूक सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. सध्या तरी सामान्य मुंबईकरांसाठी लोकलची दारं बंदच राहणार आहेत.

Similar News