"न्यायव्यवस्थेवर जाणीवपूर्वक हल्ले" संविधान दिनी सरन्यायाधीशांचे मोठे वक्तव्य

Update: 2021-11-26 12:05 GMT

न्यायव्यवस्थेवर ठरवून केले जाणारे हल्ले रोखण्यासाठी वकिलांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन देशाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमना यांनी केले आहे. संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. "वकिलांनी न्यायाधीश आणि न्यायव्यवस्थेच्या बाजुने उभे राहिले पाहिजे, असे मला सांगायचे आहे. आपण सर्वच जण एका मोठ्या परिवाराचा भाग आहोत. न्यायव्यवस्थेवर जाणीवपूर्वक होणाऱ्या हल्ल्यांपासून न्यायव्यवस्थेचे संरक्षण करणे गरजेचे आहे. सत्याच्या बाजूनचे आणि जे चुकीचे चालले आहे त्याविरोधात उभे राहण्यासाठी लाजू नका" असे आवाहनही त्यांनी केले आहे.

"देशाच्या घटनेचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे वादविवादाला एक कायदेशीर चौकट आहे. याच वादविवादांमधून देशाचा विकास होतो, देशाचे उत्थान होते आणि जलकल्याणचे नवनवे उच्चांक स्थापित केले जाऊ शकतात," असेही त्यांनी यावेळी सांगितले. यासर्व प्रक्रियेत वकिल आणि न्यायाधीशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असेही त्यांनी सांगितले. तसेच घटनेचे सखोल ज्ञान असलेल्या वकिलांनी नागरिकांना त्यांच्य़ा समाजातील भूमिकेविषयी जागृत केले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले. देशाच्या इतिहासाची, वर्तमानाची आणि भविष्याची जबाबदारी वकिलांच्या खांद्यावर आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. इतर व्यवसायांप्रमाणे कौशल्य, अनुभव आणि वचनबद्धता या व्यवसायातही आहेच पण त्याचबरोबर या व्यवसायात एकाग्रता, सामाजिक समस्यांचे ज्ञान, सामाजिक जबाबदारी आणि नागरि कर्तव्य याचाही समावेश आहे. तसेच वकिलांनी कधी कधी काही केसेस निशुल्कही लढल्या पाहिजेत, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

Tags:    

Similar News