गोपीचंद पडळकर यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा, कार्यकर्त्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप

Update: 2021-11-08 12:39 GMT

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आता राजकीय संघर्ष चांगलाच वाढला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्यासह दोन्ही गटातील 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आटपाडी पोलीस ठाण्यात पडळकर आणि पाटील यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक वादातून भाजप आणि शिवसेना – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. या प्रकरणी दोन्ही गटावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पण या वादामुळे इथे तणाव असल्याने आटपाडीमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून नाकाबंदी करण्यात आली आहे.

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू जानकर (वय 29, रा. भेंडवडे, ता. खानापूर) यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जानकर यांच्या फिर्यादीनुसार आमदार पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी आटपाडी पोलीस ठाण्यासमोर गाडी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना- राष्ट्रवादीच्या गटात हाणामारी झाली होती. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार दोन्ही गटातील दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आम्ही उभे केले आहे, त्यामुळेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Tags:    

Similar News