खनिज तेल उत्खनन क्षेत्रात भारताची मोठी झेप, इंधन विहिरींचे खोदकाम करणारी स्वदेश रिग
रशिया-युक्रेन युद्धामुळे खनिज तेलाच्या वाढत्या किमतींच्या आगीत आणखी भर पडली आहे. आपल्या गरजेच्या सुमारे ८० टक्के खनिज तेल आयात करणाऱ्या भारतासारख्या देशाची चिंता या युद्धामुळे वाढली आहे. त्यामुळेच इंधनाच्या बाबतीत देशाने आत्मनिर्भर झाले पाहिजे, असेही मत तज्ज्ञ व्यक्त करतात. या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात जास्त क्षमतेची ऑईल रिग म्हणजे खनिज तेलाच्या विहिरी खणण्यासाठी वापरले जाणारे मशीन, ओएनजीसीला सुपूर्द करण्यात आले आहे. मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL ) कंपनीने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारीत ऑईल ड्रिलिंग रिग नुकतीच आंध्रप्रदेशातील भीमावरम येथे ONGCला सोपवली आहे.
आंध्रप्रदेशमधील गोदावरी जिल्ह्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात ONGC मार्फत तेलासाठी विहिरी खणण्याचे काम केले जात आहे. सध्याच्या काळात महागलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशात भूमीत खनिज तेल शोधणे आणि त्याचे उत्पादन वाढवणे या दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत. मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL ) कंपनीने स्वदेशी आणिअत्याधुनिक तंत्रज्ञानाधारीत ऑईल ड्रिलिंग रिग तयार करुन ONGC ला सुपूर्द केली. ह्या नवीन ड्रिलिंग रिगमुळे इंधन आणि गॅस उत्पादनाचा वेग वाढणार आहे. त्याशिवाय ही यंत्रणा हाताळण्यासाठी सुरक्षित असल्याने खर्चात बचतही होत आहे. जगातील सर्वात जास्त क्षमतेची म्हणजेच २ हजार एचपी क्षमतेची ही ड्रिलिंग रिग तेल विहीरीसाठी उत्खनन करण्यासाठी वापरली जाणार आहे. आतापर्यंत मेघा इंजिनिअरिंग कंपनीने १० रिगचा पुरवठा ONGCला केला आहे. त्यातील ३ रिग वापरात आणल्या गेल्या आहेत, तर पुढील दीड ते दोन महिन्यात उर्वरित रिगचाही वापर सुरू होणार आहे.
स्वदेशी तंत्रज्ञानासह उत्तम कार्यक्षमतेच्या तेल ड्रिलिंग रिग्स तयार करणारी MEIL ही भारतातील पहिली खासगी कंपनी आहे. इंधनाची गरज आणि किंमत दिवसेंदिवस वाढत असताना अशा अत्याधुनिक रिग्ज या देशाच्या ऊर्जा क्षेत्रासाठी गरजेच्या असल्याचे MEIL चे तांत्रिक विभागाचे प्रमुख के. सत्य नारायण यांनी सांगतिले आहे.
ONGCला सुपूर्द करण्यात आलेली रिग स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आली आहे. ही रिग ऑटोमेटीक हायड्रॉलिक प्रणालीवर काम करते. एकच इंजिनीअर ही संपूर्ण रिग हाताळू शकतो. त्यामुळे देखभालीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. या रिगमुळे जमिनीच्या आत 6 हजार मीटर(6 किमी) खोलपर्यंत खणता येते. एवढेच नाही तर ह्या रिगचे भाग वेगळे करून दुसरीकडे पुन्हा उभारता येत असल्याने त्याची वाहतूक सोयीची ठरते.