#Maharashtrarain: पुरामुळे घर वाहुन गेेले, शेतीची नासधुस झाली शेतकरी हवालदिल

Update: 2021-09-08 12:30 GMT

राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. मंगळवारी अतिवृष्टीने जळगाव जिल्ह्यातील जामनेरसह चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, भडगाव, तालुक्यांना गेल्या दोन दिवसात चक्रीवादळासह अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. जामनेर तालुक्यातील 20 ते 25 गावांना अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील सुमारे 35 हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली असून, 250 घरांची पडझड झाली आहे.

शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. कापणीवर आलेल्या केळीच्या बागा आणि पूर्वहंगामी कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.



गिरीश महाजन यांनी सकाळपासून तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या बरोबर प्रशासकीय अधिकारीही होते. नुकसानग्रस्त भागात पाहणी केल्यानंतर आमदार गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं की , गेल्या दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जामनेर तालुक्यात चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. केळी, कापूस, मका यासारखी पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. जळगाव जिल्ह्यात यापूर्वीही यावल, रावेर, मुक्ताईनगर भागात चक्रीवादळामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळीही पंचनामे झाले. मात्र, अजूनपर्यंत शेतकऱ्यांना एक दमडीही मदत मिळालेली नाही. मागच्याच आठवड्यात चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले. त्या ठिकाणी मदतीची घोषणा झाली. पण नुकसानग्रस्तांना काहीही मिळालेले नाही. राज्य सरकारने किमान आता तरी शेतकरी आणि नुकसानग्रस्त लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नये, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

हातातोंडाशी आमचा घास हिरावला - शेतकरी

अतिवृष्टीमुळे आमच्या शेतातील केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत दोन दिवसात केळी कापणीवर होती मात्र निसर्गानं सर्व हिरावून घेतलं पिकांचं नुकसान झालं त्याची भरपाई सरकारने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.



पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले , दरम्यान ज्या शेतकऱ्यांचं शेतीचे नुकसान झालं असेल त्यांनी पीक विमा भरपाई साठी 72 तासांपर्यंत विमा कंपनीला नुकसानीची माहिती कळवणे आवश्यक आहे. नाहीतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांना तात्काळ माहिती द्यावी जेणेकरून भरपाई मिळेल असं जमनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी सांगितले.



चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे होत्याच नव्हतं झालं. शेकडो हेक्टर वरील पिक वाहून गेली. अनेकांची घरं जमीनदोस्त झाली, संसार वाहून गेला. आठ दिवस उलटूनही कोणतीच मदत सरकार कडून मिळालेली नाही.

Tags:    

Similar News