Nawab Malik bail : नवाब मलिक यांना दिलासा नाहीच

Update: 2022-11-24 09:16 GMT

दाऊदशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी मंत्री नवाब मलिक तुरुंगात आहेत. त्यांच्या जामीनावर सुनावणी झाली. मात्र आज झालेल्या सुनावणीत नवाब मलिक यांना दिलासा मिळाला नाही.

मनी लाँडरींग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीनाचा निर्णय 30 नोव्हेंबर पर्यंत लांबणीवर पडला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर एन रोकडे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर पुन्हा एकदा 24 नोव्हेंबर रोजी नवाब मलिक यांच्या जामीनावर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच न्यायालयाने पुन्हा नवाब मलिक यांच्या जामीनाचा निर्णय 30 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलला आहे.

संजय राऊत यांच्यापाठोपाठ अनिल देशमुख यांनाही जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना जामीन मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र नवाब मलिक यांच्या जामीनाचा निर्णय पुन्हा एकदा पुढे ढकलल्याने नवाब मलिक 30 नोव्हेंबरपर्यंत जेलमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काय आहे प्रकरण?

दाऊद टोळीकडून कुर्ला येथील पीडित मुनीरा प्लंबर यांची 300 कोटी रुपयांची जागा तीन एकर जमीन नवाब मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप करण्यात आला होता.

मुनीरा प्लंबर यांचे वडील फझलभाई गोवावाला यांच्या मृत्यूनंतर 1970 मध्ये मुनीरा आणि त्यांची आई यांच्या वाट्याला जमीनीचा समान भाग आला. त्यावेळी मुनीरा सात वर्षाच्या होत्या. मुनीरा यांच्या जमीनीची देखभाल मुस्तफा रंगवाला करायचे. मात्र मुनीरा यांनी पुढे रेहमान नावाच्या व्यक्तीकडे व्यवस्थापक म्हणून जमीनीची जबाबदारी दिली. त्यापुढे मुनीरा यांच्या आईच्या निधनानंतर मुनीरा या संपत्तीच्या एकमेव वारस उरल्या.

त्यावेळी मे. सॉलिडस इंडस्ट्रीचे मालक सलीम पटेल यांच्याकडे येत होते. सलीम पटेल यांची दोन गोदामं मुनीराच्या जमीनीवर होती. मात्र पुढे या जमीनीवरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी सलीम पटेल यांना अधिकार देण्यात आले होते. मात्र या जमीनीची मालकी पटेल यांच्याकडे कशी गेली? तसेच नवाब मलिक यांना या जमीनीची मालकी कशी मिळाली? याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे मुनीरा यांनी सांगितले.

या जमीन व्यवहारात सरदार शहावली खान महत्वाच्या भुमिकेत होता. हा शहावली खान 1993 च्या बाँबस्फोटातील गुन्हेगार आहे. तो सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तसेच सलीम पटेल हा हसीना पारकर यांचा चालक होता. त्यामुळे नवाब मलिक आणि हसिना पारकर यांनी जमीनीचा मोठा भाग बळकवण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच आपल्याला धमकावल्याचा आरोप मुनीरा यांनी केला. याबरोबरच ज्या जमीनीची किंमत तीन कोटी 30 लाख रुपये होती.

त्यातील केवळ 15 लाख रुपये नवाब मलिक यांच्याकडून भरण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणी नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती. मात्र आता नवाब मलिक यांच्या जामीनावर निर्णय येणे बाकी आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना जामीन मिळणार की नाही? हे 30 नोव्हेंबरला समजणार आहे.

Tags:    

Similar News