"रोजगारा निमित्त होणारे स्थलांतर ही राष्ट्रीय समस्या" राज ठाकरेंच्या भूमिकेत बदल?

परप्रांतियांच्या मुद्द्यावर आक्रमक असणाऱ्या राज ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लिहिलेल्या एका लेखात आपल्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडली आहे.

Update: 2021-08-15 04:12 GMT

देशात सध्या बेरोजगारी वाढली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते आहे, पण याकडे तुकड्या तुकड्यात न पाहता एक देश म्हणून विचार केला पाहिजे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. एरवी परप्रांतियांच्या लोंढ्यांबाबत त्या त्या राज्यांची सरकारं किंवा महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या राज ठाकरे यांनी आता वेगळी भूमिका मांडली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून राज ठाकरे यांनी देशापुढील आव्हानांबाबत काय केले पाहिजे याबाबत आपली भूमिका मांडली आहे.

"महाप्रचंड लोकसंख्या, शेतीपुढील आव्हानांमुळे उद्योग- सेवा क्षेत्रावर रोजगारनिर्मितीचा आलेला ताण, शिक्षण आणि रोजगार संधी यांमधील समन्वयाचा अभाव आणि यातूनच होणारे महाभयंकर स्थलांतर! हे प्रश्न सोडवायचे असतील तर तुकड्या-तुकड्यात विचार करून चालणार नाही. त्यांना समग्रतेने भिडावं लागेल. त्यासाठी सर्वात आधी एक देश म्हणून आपल्याला विचार करावा लागेल."अशा भूमिका त्यांनी मांडली आहे.

"एका स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून आपण सर्वजण आज ७५व्या वर्षात पदार्पण करत आहोत. मी 'आपण' असं म्हणतोय कारण शेवटी देश म्हणजे लोकच- 'आम्ही भारताचे लोक'! १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हापासून आजपर्यंत आपण अनेक क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती केली. पण ही प्रगती सर्वसमावेशक होऊ शकली का? सर्व राज्यांना या प्रगतीचा लाभ मिळाला का? दुर्दैवाने या प्रश्नाचं उत्तर 'नाही' आहे.

असंतुलित प्रगती आणि विकासामुळे आज देशापुढे नवीनच प्रश्न उभे राहिले आहेत. महाप्रचंड लोकसंख्या, शेतीपुढील आव्हानांमुळे उद्योग- सेवा क्षेत्रावर रोजगारनिर्मितीचा आलेला ताण, शिक्षण आणि रोजगार संधी यांमधील समन्वयाचा अभाव आणि यातूनच होणारे महाभयंकर स्थलांतर! हे प्रश्न सोडवायचे असतील तर तुकड्या-तुकड्यात विचार करून चालणार नाही. त्यांना समग्रतेने भिडावं लागेल. त्यासाठी सर्वात आधी एक देश म्हणून आपल्याला विचार करावा लागेल.

देशात आणि आपल्या राज्यातही सर्वच पातळ्यांवर सुरू असलेल्या द्वेषमूलक प्रचारामुळे या तरुण पिढीच्या स्वप्नांचा बळी जाऊ नये, उलट सामाजिक विद्वेष पसरवणाऱ्या सत्तापिपासूंच्या छाताडावर उभं राहून 'सत्यमेव जयते'चा नारा बुलंद करण्याचं बळ त्यांच्या अंगी यावं, यासाठी पोषक वातावरण निर्माण करणं, ही काळाची गरज आहे.

सात दशकांत जे व्हायचं होतं ते झालं, पण आता यापुढच्या प्रत्येक दशकात काय करायचं ते आपल्या हातात आहे. माझ्या, तुमच्या, आपल्या सर्वांच्या हातात," असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News