भाषणात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही ? वन विभागाच्या महिला कर्मचारी माधुरी जाधव यांचा गिरीश महाजन यांना सवाल
"सस्पेंड केलं तरी चालेल पण माफी मागणार नाही... पालकमंत्री म्हणून आपण आपल्या भाषणात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही ?" असा ठाम जाब वन विभागाच्या महिला कर्मचारी माधुरी जाधव यांनी सार्वजनिकरित्या पालकमंत्री गिरीश महाजन यांना विचारला आहे.
नेमकं काय घडलं प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात ?
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने थेट त्यांना जाब विचारला. या घटनेमुळे कार्यक्रमात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ध्वजवंदनानंतर भाषण केले. भाषणात त्यांनी विविध महापुरुषांचा उल्लेख केला, पण संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मात्र घेतले नाही. याचवेळी वन विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी माधवी जाधव यांनी पुढे येऊन मंत्री महाजन यांना थेट प्रश्न विचारला. "प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?" असा सवाल त्यांनी केला.
मंत्री महाजन यांनी यावर उत्तर देताना परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, पण माधवी जाधव यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. "सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही," असे त्या म्हणाल्या. संविधानाच्या सन्मानाचा हा मुद्दा असल्याचे त्या म्हणाल्या. पोलिसांनी त्यांना बाजूला नेले, तरीही त्या आपल्या मतावर अडून राहिल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी महिला कर्मचाऱ्याच्या धैर्याचे कौतुक केले आहे. काहींनी मंत्री महाजन यांच्या भाषणातील चुकीवर टीका केली आहे. "भीमाची वाघिण" असे कॅप्शन वापरून सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट्स येत आहेत.
दरम्यान भाषणाहून झालेल्या राड्यासंदर्भात पालकमंत्री यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. नाव वगळण्याचा उद्देश नसून आपल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं पालकमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.