भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विधाने फार मनावर घेऊ नये- जयंत पाटील

Update: 2021-10-27 02:57 GMT

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विधाने फार मनावर घेऊ नयेत, त्यांना महाविकास आघाडी सरकार पडेल अशीच स्वप्नं पडतात. त्यांच्या प्रसिध्दीसाठी सुरू असलेल्या टीकांना उत्तर देणे आता आम्हाला फारसं शक्य होणार नाही. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ते सांगलीत बोलत होते. सोबतच महाविकास आघाडी सरकारला दररोज बदनाम करण्याचा कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे, असा आरोप मंत्री पाटील यांनी केला.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी राज्य सरकारवर केलेल्या टीकेबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबत आता फारसं मनावर घेऊ नका, त्यांचे दररोजचे हेच काम आहे. माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यावर सतत प्रतिक्रिया देणे आता शक्य होईल असं वाटतं नाही.

समीर वानखेडे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, मंत्री नवाब मालिक यांच्याकडून समीर वानखडे यांच्या बाबतीत ज्या पद्धतीने घटनाक्रम सादर केला जात आहे. या प्रकरणात मोठ्या रकमेची लाचखोरी करण्याचं सांगितल्याचे आता पुढे आले आहे. यामध्ये भाजपा समर्थक सहभागी असल्याचं मलिक यांनी सांगितले आहे, त्यामुळे हे सर्व प्रकरण लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे असं पाटील म्हणाले.

वानखेडे यांच्याबाबतीत काही कागदपत्रे नवाब मलिक यांच्याकडून सादर करण्यात आली आहे, ते जर खरे असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. चुकीच्या पद्धतीने सरकारी सेवेत जर कोणी आले असेल तर याबाबत पाऊलं उचलावी लागतील असंही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News