ममता बॅनर्जी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात...

Update: 2021-05-21 14:17 GMT

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत नंदीग्राम मतदार संघात अटी तटीच्या लढाईत पराभूत झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढणार आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत हॅट्रीक मारणाऱ्या ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव झाला होता.

ममता बॅनर्जी यांचे जुने सहकारी सुवेंदु अधिकारी यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान देण्यासाठी ममता यांनी त्यांचा परंपरागत भवानीपूर मतदारसंघ सोडून नंदीग्राम येथून निवडणूक लढविली होती. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भवानीपूर येथून विजयी झालेले तृणमूलचे आमदार शोभन देव चट्टोपाध्याय यांनी आज दुपारी बंगाल विधानसभेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला.

या मतदारसंघातून ममता बॅनर्जी लढवणार निवडणूक

विधानसभेचे अध्यक्ष बिमान बंडोपाध्याय यांनी राजीनामा स्वीकारला असून आमदार शोभन देव यांनी एका खाजगी वाहिनीशी बोलताना

ममता बॅनर्जी येत्या सहा महिन्यांत भवानीपूरमधून निवडणूक लढवतील असं सांगितलं आहे.

पश्चिम बंगाल निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये मात्र, आपले जुने सहकारी शुभेंदु अधिकारी यांच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झाल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री पदावर राहण्यासाठी ममता बॅनर्जी यांना सहा महिन्यांत पोटनिवडणूक लढवून राज्य विधानसभेची सदस्य व्हावे लागेल.

घटनेच्या कलम १६४ नुसार सहा महिन्यांच्या आत आमदार नसलेल्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो.

शुभेंदु अधिकारी यांनी टीएमसी सोडल्यानंतर काही आठवड्यांमध्ये ममता बॅनर्जी यांनी 18 जानेवारी रोजी झालेल्या एका रॅलीमध्ये त्या भवानीपूर ऐवजी नंदीग्राममधून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघांचं २०११ आणि २०१६ मध्ये प्रतिनिधीत्व केलं होतं. ममता बॅनर्जी या स्वतः भवानीपूर मतदारसंघातील मतदार आहेत.

ममता बॅनर्जींची 'ती' एक घोषणा

"मी नंदीग्राममधून निवडणूक लढवणार आहे, नंदीग्राम माझ्यासाठी भाग्यवान ठिकाण आहे." त्यानंतर त्यांनी भवानीपूरच्या मतदारांना आपला निर्णय समजून घेण्याचे आवाहन केले.

"नंदीग्राम ही माझी मोठी बहीण आहे,. शक्य झाल्यास मी दोन्ही ठिकाणांहून निवडणूकीला सामोरं जाईल. मला भवानीपूर येथून निवडणूक लढवता आली नाही तर माझ्याऐवजी कोणीतरी तिथून निवडणूक नक्की लढवीन."

असं वक्तव्य त्यांनी केलं होत.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक भाजप नेत्यांनी ममतांना "दुसर्‍या जागेवरून निवडणूक लढवण्याबद्दल" टोमणे मारले होते आणि नंदीग्राममध्ये होणाऱ्या पराभवाला त्या घाबरत आहेत का? असा सवाल केला होता. मात्र, ममता बॅनर्जी यांनी ही शक्यता नाकारली होती.

80 वर्षीय शोभन देव चट्टोपाध्याय हे २०१६ मध्ये रासबिहारी मतदारसंघातील आमदार होते आणि मागील कार्यकाळात ते उर्जामंत्री सुद्धा होते. यावेळी त्यांना भवानीपूर येथून भाजपचे अभिनेते - राजकारणी रुद्रनिल घोष यांच्या विरोधात मैदानात उतरले होते. त्यांनी घोष यांचा पराभव केला आणि 9 मे रोजी कृषी मंत्री पदाची शपथ घेतली.

Tags:    

Similar News