लालूप्रसाद यादव यांच्या चिरंजीवांचा ‘प्रताप’

Update: 2025-05-25 13:31 GMT

बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तथा बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यादव हे कायमच चर्चेत असतात. मात्र, यावेळी कारण थोडं वैयक्तिक आहे. त्यामुळं बिहारच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.

आपल्या बिनधास्त शैलीमुळं तेजप्रताप यादव नेहमीच चर्चेचा विषय ठरत आलेले आहेत. २४ मे २०२५ रोजी तेज प्रताप यादव यांच्या ट्विटरवर एक पोस्ट करण्यात आली. यामध्ये अनुष्का यादव नावाच्या एका महिलेसोबत तेजप्रताप यांचा फोटो आहे. त्याखालील पोस्टमध्ये आम्ही दोघंही मागील १२ वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहत असल्याचा उल्लेख आहे.





 


तेजप्रताप यांच्या पोस्टनंतर दुसऱ्याच दिवशी लालूप्रसाद यादव यांनीही ट्विटरवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये लालूप्रसाद यांनी तेजप्रताप यांना पक्ष आणि कुटुंबातून बेदखल केल्याचं जाहीर करत त्यांच्याशी यापुढे कसलाही संबंध नसल्याचं म्हटलंय.

 


यादव कुटुंबातल्या एका सदस्याचा हा ‘प्रताप’ पाहून सोशल मीडिया युजर्सनंही संमिश्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. तेजप्रताप यादव यांनी पहिल्या पोस्टनंतर काही तासातच घूमजाव केलं. तेजप्रताप यादव यांनी त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कुणीतरी हॅक केले, चुकीच्या पद्धतीनं त्यात एडिट करण्यात आल्याचं म्हटलंय. पहिल्या पोस्टमुळं माझ्या कुटुंबाला आणि मला बदनाम केलं जात असल्याचं तेजप्रताप यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्याचवेळी तेजप्रताप यांच्या ट्विटरवरुन ती पहिली पोस्ट डिलिट करण्यात आली होती. दरम्यान, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन तेजप्रताप यांनी केलंय.

दरम्यान, तेजप्रताप यांनी अनुष्का यादव यांच्यासंदर्भातील ती पोस्ट डिलिट केली असली तरी लालूप्रसाद यादव यांनी मात्र तेजप्रताप यांना पक्ष आणि कुटुंबातून बेदखल केल्याची पोस्ट कायम ठेवलेली आहे. त्यामुळं तेजप्रताप यांनी आता कितीही घूमजाव करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी या प्रकरणाचं गांभिर्य अजूनही कमी झालेलं नाही. तेजप्रताप यादव यांची पहिली पोस्ट आल्यानंतर त्यांनी लागलीच कायदेशीर कारवाईचा पर्याय का स्विकारला नाही ? तेजप्रताप यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका का मांडली नाही ? कुटुंबियांशी यासंदर्भात त्यांनी चर्चा केल्याचीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर विधानसभेच्या निवडणुकांआधीच बिहारमधील राजकीय वातावरण तापल्याचं दिसतंय.

Tags: