'2400 कोटी रुपयांच्या नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाला मान्यता'- गडकरी

Update: 2021-08-29 11:08 GMT

नागपूर : केंद्रीय रस्ते,परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपुरातील 2400 कोटींच्या नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाला केंद्रीय अर्थ सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडून काल मान्यता मिळाली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात दिली. नागपूरात 18 कोटी रुपये खर्च करून सोनेगाव तलावाच्या सौंदर्यकरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे,माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह शेकडो नागरीक उपस्थित होते.

नागनदी शुद्धीकरण प्रकल्पात येणाऱ्या अडचणी दूर केल्या जात असून आता लवकरच सल्लागार नियुक्त करून दोन तीन महिन्यात नागनदी शुद्धीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले, नागनदी शुद्धीकरणाचे काम फ्रान्सच्या कंपनीकडून केले जाणार आहे. नागपूरात ज्या मार्गावरून मेट्रो ट्रेन जात आहे ते सर्व मार्ग सिमेंटचे करण्यासाठी रस्ते विकास निधीतून 200 कोटी रुपये खर्च केले जात आहे. या कामांची निविदा ही काढण्यात आली असून मेट्रोच्या आजूबाजूचे रस्तेही चांगले केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले, नागपुरातील मिहान येथे आत्तापर्यंत 57 हजार युवकांना रोजगार दिला असून येत्या 3 वर्षात 1 लाख तरुण मुलांना रोजगार देऊ असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

तर माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याचे कौतुक करीत नितीनजी आधुनिक नागपूरचे शिल्पकार असल्याचे म्हटले आहे. नितीनजींनी नागपूरचा सर्वांगीण विकासाचा विचार करून कार्य केले, गेल्या 5 वर्षात नितीन गडकरी यांच्या सहकार्याने नागपूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Tags:    

Similar News