शेतकरी संकटात मराठवाड्यातील पालकमंत्री कुठं?

Update: 2020-10-17 08:04 GMT

Courtesy -Social media

औरंगाबाद: दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी जवळपास उद्ध्वस्त झाला आहे. शेतातील पीक गुडघाभर पाण्याखाली आहे. तर अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याला सरकारचा आधार मिळावा ही अपेक्षा असते. मात्र असे असतानाही मराठवाड्यातील जिल्ह्यात आत्ता पर्यंत पालकत्वाची जवाबदारी असलेले पालकमंत्री अजूनही शेतकऱ्यांच्या बांधावर फिरकले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई सध्या मुंबईत आहेत. तर जालना जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी असलेले राजेश टोपे सुद्धा या दोन दिवसाच्या पावसानंतर कुठेही शेतकऱ्यांची विचारपूस करताना दिसून आले नाहीत. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख सुद्धा अजूनही शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कुठंही दिसलेले नाहीत.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे सुद्धा अजूनही बांधावर पोहचले नाहीत. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक सध्या मुंबईत पक्षाची बाजू मांडण्यातच व्यस्त असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण अद्यापपर्यंत नांदेडला फिरकले नाहीत. उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख सुद्धा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी आत्तापर्यंत पाहायला मिळाले नाही. तसेच हिंगोलीचे पालकमंत्री वर्षा गायकवाड यांना सुद्धा अजूनही शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कधी नव्हे इतका पाऊस झालेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने जवळपास १ लाख २३ हजार ९३० हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे १०० कोटीपेक्षा जास्तीचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

Tags:    

Similar News