निवडणूक आल्यावरच ऊसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेना टोला

सत्ता गेल्यानंतरच ऊसतोड कामगारांची आठवण होते. अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.

Update: 2021-12-19 03:35 GMT

बीड // नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापायचे पाहायला मिळत आहे. प्रचाराची रणधुमाळी उडाली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आमने सामने आलेत. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपाला नगरपंचायत निवडणूक लढवायला साधा उमेदवार मिळत नसल्याची टीका धनंजय मुंडे यांनी यावेळी केली आहे.

पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कोणीच प्रयत्न केला नाही. आजही जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे. 12 डिसेंबर 2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड महामंडळाची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण, पाच वर्ष सत्ता असतानाही महामंडळाची निर्मिती झाली नाही. सत्ता गेल्यानंतरच ऊसतोड कामगारांची आठवण होते. अशा शब्दांत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र दौरा करणार असल्याची घोषणा केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीका केली.

दरम्यान कर्नाटकामध्ये दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती.त्यावरून त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. अज्ञात समाजकंटकांनी हे कृत्य केले होते. कर्नाटकामध्ये आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, परंतु भाजपाचा एकही नेता याबद्दल बोलला नाही. यांना फक्त निवडणुका आल्या तेव्हाच महाराज आठवतात असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

Tags:    

Similar News