अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग, मुख्यमंत्र्यांचे सखोल चौकशीचे आदेश

Update: 2021-11-06 11:58 GMT

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आग का आणि कशी लागली याची माहिती अजून समोर आलेली नाही. पण जिल्हाधिकाऱ्यांनी ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच या चौकशीत जे जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड ICU कक्षाला आग लागल्याने ही दुर्घटना घडली. अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व प्रतिबंधक उपाययोजना करा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

दरम्यान राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. तसेच चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे. ही दुर्घटना कुणाच्या चुकीमुळे घडली याची माहिती समोर आल्यानंतर कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम पाटील यांनीही दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. अहमदनरचे खासदार सुजय विखे पाटील यांनीही घटनास्थळाला भेट दिल्यानंतर मृतांच्या वारसांना १० लाखांची मदत आणि सरकारी नोकरी देण्याची मागणी केली आहे.

Tags:    

Similar News