चीनचा गलवान खोऱ्यावर ताबा? भारताकडून प्रतिक्रीया नाही

Update: 2022-01-03 10:36 GMT

 नव्या वर्षाच्या औचित्याने लडाखमधील गलवान खोऱ्यायमध्ये चीनी सैनिकांनी आपला ध्वज फडकावला आहे. तसेच या खोऱ्यावर आपला ताबा असल्याचंच एकप्रकारे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. याचे व्हिडीओ चीन सरकारने आपल्या अधिकृत वृत्तवाहिनीवरुन प्रसारितही केले आहेत. या सगळ्या प्रकाराबाबतच आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत नरेंद्र मोदींच्या ५६ इंची दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.विशेष म्हणजे सोशल मिडीयाच्या माध्यमातून नेटीझन्सनं यावर प्रश्न उपस्थित करुन सरकारला जाब विचारला आहे.

त्यांनी म्हटलंय की, चीनला उत्तर द्यायला हवं. यासाठी पंतप्रधान मोदींनी तोंड उघडलं पाहिजे. चीनचा सरकारी मीडिया ग्लोबल टाइम्सने एक जानेवारी रोजी आपल्या चीनी सैनिकांचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्या व्हिडीओला कॅप्शन दिलंय की, भारतीय सीमेजवळ गलवान खोऱ्यामध्ये चीनचे नागरिक नव्या वर्षासाठी शुभेच्छा देत आहेत.

या व्हिडीओमध्ये ज्याठिकाणी चीनी सैनिक उभे आहेत, त्याच्या मागील डोंगरावर चीनी भाषेत लिहंलय की, आम्ही एक इंचही जमीन देणार नाही. तर दुसरीकडे चीनी सैनिकांनी जाहिर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, त्याठिकाणी चीनचा झेंडा देखील फडकावला आहे. भारताने अद्याप तरी अधिकृत रित्या कसल्याच प्रकारचे उत्तर चीनला दिलं नाहीये.

या सगळ्या प्रकारावर संताप व्यक्त करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी ट्विट करत म्हटलंय की, गलवानमध्ये आपला तिरंगाच चांगला दिसतो. चीनला सडेतोड उत्तर द्यावचं लागेल. मोदीजी, तुमचं तोंड उघडा! याआधी देखील राहुल गांधींनी चीनच्या या उद्दाम वागण्याला उत्तर न देण्यावरुन मोदींवर निशाणा साधला आहे.

15 आणि 16 जून 2020 च्या मध्यरात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. या संघर्षात भारताचे 21 जवान शहीद झाले होते. चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आगळीक करत भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांमधील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. दोन्ही देशांनी लडाखमधील काही भागांमधून सैन्य माघारी घेण्यावर एकमताने निर्णय घेतला. मात्र, अद्यापही समाधानकारक तोडगा निघाला नाही.


Full View

Tags:    

Similar News