क्रिएटर्ससाठी रवींद्र आंबेकर यांचे अपिल

Tiktokवरील बंदीमुळे यावर लाखो फॉलोअर्स असलेले स्टार्स सध्या अंधारात गेले आहेत. अशाच काही क्रिएटर्ससाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी एक आवाहन केले आहे.

Update: 2022-01-01 14:47 GMT

मुंबईत एक टिकटॉक गार्डन होतं. या गार्डनमध्ये एखाद्याला खडा मारला तरी तो ७-७० मिलिअन फॉलोअर्स वाला स्टार असायचा. मी या गार्डन ला नेहमी भेट द्यायचो. कुठलीही संसाधनं नसलेले हे स्टार कसं कंटेंट बनवायचे हे बघत बसायचो. अचानक टिकटॉक बंद झालं. हे सगळे स्टार पोरके झाले. त्यातले काही फेसबुक-युट्युब रिल्स/शॉर्ट व्हिडीयो करू लागले, टिकटॉक सारखे आणखी ही अनेक ॲप आले. त्यात कंटेंट बनवू लागले. पण एकूणच या सगळ्या स्टार्सचं स्टारडम रातोरात संपलं.

आता काही जण युट्यूबर म्हणून करिअर करू पाहत होते.. कोविडमध्ये युट्यूब ने मोठ्या प्रमाणावर अल्गोरिदम बदलला आणि युट्यूबची प्रेक्षकसंख्या, महसूल एकदम खाली आला.

मध्यंतरी काही युवक-युवती माझ्या संपर्कात आले. त्यांनी असंच कंटेंट क्रिएटर म्हणून काम केलंय. त्यांना व्ह्यूज चांगले येत होते, मात्र पैसे मिळत होते. स्वतःचंच करायचं या अट्टाहासामुळे त्यांना इतर कुणासोबत कामही करायचं नाहीय. अशा द्वंद्वात सापडलेली अनेक जण आहेत. ज्यांना स्वतंत्र काम करायचंय अशा लोकांना इतर कुणाचंही वर्चस्व नको असतं, मात्र पुढे जायचं असेल तर छोट-छोटे टाय-अप्स, बार्टर, MOU किंवा पार्टनरशीप करणं भागच आहे. पण अनेकांची या साठीही तयारी नसते. त्यामुळे त्यांचं कंटेंट चांगलं असूनही त्याला व्यावसायिक स्वरूप येऊ शकत नाही. यावर तोडगा म्हणून अशा कंटेंट क्रिएटर्स ना तांत्रिक सहकार्य, प्रशिक्षण देण्यासाठी आपण कशी मदत करू शकू यावर विचार करत होतो. काही लोकांशी चर्चा ही केली. या वर्षात अशा कंटेंट क्रिएटर्स साठी एक वेगळी स्पेस तयार करण्याचा माझा विचार आहे. कुणाला या प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल तर कृपया संपर्क करा.

maximummaharashtra@gmail.com

मेल मध्ये तुम्ही कशा पद्धतीने सहभागी होऊ शकता हे लिहा. एका ओळीचे मेल पाठवू नका. स्वतःची ओळख ही स्पष्टपणे द्या.

Tags:    

Similar News