मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

Update: 2022-08-15 04:30 GMT

जळगाव : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगावमध्ये ध्वजारोहण सोहळा पार पडला. पण या कार्यक्रमाला एका घटनेमुळे गालबोट लागले आहे. गुलाबराव पाटील ध्वजारोहण करत असतानाच एका महिलेन स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण सोहळ्याच्या कार्यक्रमात या महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पण पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच या महिलेला रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे. वंदना सुनील पाटील असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे. ही महिला आणि तिचा पती यांचे गेल्या महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. पण प्रशासन त्यांच्या मागणीची दखल घेत नसल्याने महिलेने हे कृत्य केल्याची माहिती मिळते आहे.

जामनेर येथील काही धान्य व्यापाऱ्यांनी या महिलेच्या आणि तिच्या पतीच्या शेतमालाची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी आहे. पण कारवाई होत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

Similar News