बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी स्वत: मैदानात उतरले आहेत.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत साखर उद्योगातील ज्येष्ठ तज्ज्ञ चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या नेवृत्वाखालील ‘शेतकरी बचाव सहकारी पॅनेल’ ने एकूण एकवीस जागांपकी पंधरा जागेवर घवघवीत यश मिळवून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कारखान्याची सत्ता खेचून घेतली होती.
अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला फक्त सहा जागांवरच समाधान मानावे लागले होते. एखाद्या उमेदवाराला निवडणुकीत चारी मुंड्या चित करण्याची ताकद असणाऱ्या आणि महाराष्ट्रातील सहकारावर मजबूत पकड असणाऱ्या पवार कुटुंबाला स्वत:च्या तालुक्यातील कारखान्य़ाच्या निवडणुकीत पराभूत करण्याची किमया ‘शेतकरी बचाव सहकारी पॅनेल’ ने केली होती. त्यामुळे आता अजित पवार स्वत: मैदानात उतरले आहेत.
एका बाजूनं परखड टीका करणारे रोख ठोक भूमिका मांडणारे अजित पवार तर दुसऱ्या बाजूला शांत, संयमी, मृदुभाषी आणि साखर कारखानदारी क्षेत्रातील माहिती असणारे चंद्रराव तावरे यांच्यात हा खरा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि भाजपच्या ताब्यात असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना या दोन कारखान्यांनी दिलेल्या दरांचा विचार शेतकरी या निवडणुकीत करत आहेत. त्यामुळे या दोनही दराचा विचार केला शेतकरी सभासद कोणाच्या पारड्यात मतदान टाकणार हे पाहणं महत्वाचं आहे.
राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 3300 रुपये दर देऊन राज्यात उच्चांकी दर दिल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 3400 रुपये दर देऊन सोमेश्वरचा विक्रम मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. तसंच माळेगाव सहकारी साखर कारखानाने खोडव्यासाठी 150 रुपयांचे अनुदान देत खोडव्याला 3550 रुपये भाव जाहीर केला होता. तसेच 10001 व 8005 जातीच्या ऊसाला 100 रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. यावर अजित पवार यांनी एका प्रचार सभेत बोलताना 3400 रुपये दर सत्ताधाऱ्यांनी दिला आहे. त्यापैकी 234 रुपये अद्याप मिळालेले नसल्याचा दावा केला आहे. पाच वर्षात 50 रुपयांची ठेव मिळालेली नाही. जवळपास 284 रुपये देणे बाकी असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहेत. त्यामुळं सर्वाधिक दर दिल्याचा दावा करणारे सत्ताधारी आणि दर जाहीर करुनही तो दर न दिल्याचं सांगणारे अजित पवार यामध्ये मतदार कोणाला पसंती देतात. हे पाहणं महत्वाचं आहे.
माळेगाव सहकारी कारखानाने विस्तारीकरण करुन उपपदार्थ निर्मिती केल्यामुळे सभासदांना उच्चांकी दर देता आल्याचा दावा माळेगाव सहकारी साखर कारखाना अध्यक्ष रंजन तावरे यांनी केला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी माळेगाव सहकारी कारखान्याच्या प्रचाराच्या सभेत बोलताना कारखान्याच्या विस्तारवाढीला विरोध असताना देखील कारखान्याचा विस्तार करण्यात आला. मात्र, अपेक्षित पध्दतीने कारखाना चालला नाही. कारखान्यात अनेक वेळा ऊसाचा रस वाया गेला. गेटकेन गाळपाला प्राधान्य देण्याच्यासत्ताधाऱ्यांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे गहू पिकाचे नुकसान झाले. सत्ताधाऱ्यांनी कारण नसताना देखील माळेगावचा घास मोठा केला. इथुन पुढे माळेगावला बाहेरच्या ऊसाशिवाय गत्यंतर नाही. अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा विचार करताना मागील काही निवडणुकांवर नजर टाकली असता, माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सभासदांनी कोणत्याही एका पक्षाला झुकतं माप दिलं नसल्याचं दिसून येतं.
1997 ला कारखान्यावर चंद्रकांत तावरे यांच्या गटाची सत्ता होती. शरद पवार हे त्यावेळी कॉंग्रेसमध्ये होते. कॉंग्रेसच्या पॅनेलचा त्यावेळी पराभव झाला होता.
तर 2002 च्या निवडणुकीत शरद पवार यांनी स्वत: लक्ष घालत तावरे गटाशी मनोमिलन करत निवडणूक बिनविरोध केली.
2007 ला झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली.
मात्र, राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे 2012 ला होणारी निवडणूक 2015 ला झाली. या निवडणुकीत गुरु शिष्याची जोडी असलेल्या सहकार महर्षी चंद्रकांत तावरे आणि रंजन तावरे आणि अजित पवार यांच्या निलकंटेश्वर पॅनेलाचा 15-6 अशा फरकाने पराभव केला. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी अजित पवार बारामतीत तळ ठोकून आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात आम्ही स्थानिक पत्रकार वसंत मोरे यांच्याशी बातचित केली असता, त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने अजित पवार यांच्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्या पेक्षा 100 रुपये भाव अधिक दिल्यानं सभासद पुन्हा एकदा तावरे यांच्या ‘सहकार बचाव’ पॅनलला संधी देण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. मात्र, अजित पवार यांनी माळेगाव सहकारी कारखान्याच्या विस्तारीकरणाबाबत सत्ताधाऱ्यांना व्यवस्थित विस्तारीकरण करता आलं नाही. असा आरोप केला आहे. त्याचा देखील सभासद मतदारांवर परिणाम होऊ शकतो. अशा प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना दिली आहे.
माळेगाव सहकारी कारखाना दादाच्या विरोधात गेला तर...
माळेगाव सहकारी साखर कारखाना अजित दादांच्या विरोधात गेला तर पवार कुटुबियांना त्यांच्या इतर कारखान्यांना माळेगाव कारखान्या प्रमाणे दर द्यावा लागतो. पवार कुटुबियांचे साधारण 6 कारखाने आहेत.
बारामती अग्रो हा आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांचा खाजगी साखर कारखाना आहे.
शरयू साखर कारखाना हा अजित पवार यांचे बंधू श्री निवास पवार यांचा खासगी साखर कारखाना आहे.
तर अजित पवार यांचे स्वत:चे खासगी कारखाने तर आहेच. त्याचबरोबर दोन सहकारी साखर कारखान्यांवर अजित पवार यांच्या पॅनल ची सत्ता आहे.
अंबालिका साखर कारखाना कर्जत आणि दौंड शुगर साखर कारखाना हे त्यांचे खासगी कारखाने आहेत. तर छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखाना या दोन सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार यांच्या पॅनेलची सत्ता आहे. त्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे काही महिन्याचे पगार थकलेले आहेत.
त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखाना जर विरोधात गेला तर पवार कुटुंबाचं वर्चस्व असलेल्या साखर कारखान्य़ांना माळेगाव सहकारी साखर कारखान्याने जास्त भाव दिला तर माळेगावर कारखान्या प्रमाणे ऊसाला दर द्यावा लागतो. त्यामुळे अजित पवारांना इतर कारखान्यांना माळेगाव प्रमाणे दर द्यावा लागतो. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखाना अजित दादांच्या विरोधात गेला तर इतर काऱखान्यांना चांगला भाव मिळतो. असा मतदारांचा सूर असल्याचं स्थानिक पत्रकार वसंत मोरे यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं.
माळेगाव सहकारी कारखान्यामध्ये साखर निर्मिती बरोबरच इथेनॉल निर्मिती, बायोगॅस निर्मिती, सहवीज निर्मित प्रकल्प आहेत. त्यामुळे माळेगाव सहकारी साखर कारखान्यांवर कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरी या कारखानाची दिवसेंदिवस प्रगती झाल्याचे पाहायला मिळते.
मात्र, अलिकडे एखादा कारखाना तोट्यात आणायचा. तोट्यात आलेला कारखाना विकत घेण्यासाठी आपल्याच जवळच्या कोणाला तरी निविदा भरायला लावायच्या. आणि त्या कारखान्यावर वर्चस्व स्थापन करायला लावायचे. असे प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील सहकारी साखर कारखानदारी धोक्यात आली असून हे प्रकार असेच सुरु राहिले तर राज्यात सहकारी साखर कारखाने औषधाला देखील शिल्लक राहणार नाहीत. त्यामुळे या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा विचार केला तर सहकारी तसंच खासगी कारखान्याचा कारभार करणारे अजित पवार आणि दुसरीकडे सहकाराची खडा न खडा माहिती असणारे सहकार महर्षी चंद्रकांत तावरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या निवडणुकीत कोणाच्या पॅनलला ऊस उत्पादक पसंती देतात. हे निकालाच्या दिवशीचं पाहायला मिळेल.