Ground report : तलाव फुटून शेतीचे नुकसान, शेतकरी महिलेचा आक्रोश

Update: 2021-09-11 12:30 GMT

बीड जिल्ह्याला गेल्या आठ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे 33 मंडळात शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.


गेवराई तालुक्यातील आमला गावातील एक तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. इंदुबाई धायगुडे या महिला शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले आणि शेतातील माती वाहून गेली यामुळे हतबल झालेल्या महिला शेतकऱ्यांनी आपला टाहो फोडला आहे. "शेतातील पीक गेलं, माती गेली आता मी काय करू.... माझ्या लेकराचे कुणीतरी मायबाप व्हा.... हा तलाव फुटल्यानं माझ्या जीवनाचे पूर्ण वाटोळे झाले. आता मी काय करू माझी मुलं आता रस्त्यावर आली आहेत, सरकारने आम्हाला काहीतरी मदत करावी" अशी मागणी या महिला शेतकऱ्यांनी केली आहे.


इंदुबाई यांनी शेतात तीन लाखाची माती टाकली होती, पण ती सर्व माती वाहून गेली आहे. आता आम्ही काय करावं हा प्रश्न आमच्यापुढे आहे, असे त्या सांगतात. त्यांच्या मुलाने सांगितले की, मागील दोन वर्षापासून आम्ही पिक विमा भरतो. परंतु आम्हाला अजून पिक विम्याची रक्कम मिळालेली नाही. यावर्षीही पीक विमा भरला, परंतु सरकारने मदत केलेली नाही, असे त्यांनी सांगितले.

गेवराई तालुक्यात 1 लाख 6 हजार क्षेत्र बाधित झाले आहे. तर 8 पाझर तलाव फुटले आहेत. खरडून गेलेले क्षेत्र 5000 हेक्‍टर असून सर्व तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक व महसूल अधिकारी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम आम्ही करत आहोत, अशी माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. पण मदत कधीपर्यंत मिळेल ते त्यांनी सांगितलेले नाही.


पाटबंधारे विभागाला आम्ही तलावाच्या संदर्भात अर्ज दिला होता, पाहण्यासाठी या असे सांगितले देखील पण या विभागाचे कुणीही आले नाही. त्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या शेतातील माती वाहून गेली त्यामुळे आम्हाला शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नद्या पुन्हा एकदा तुडूंब भरून वाहू लागल्या आहेत. लघु आणि मध्यम प्रकल्प भरुन वाहत आहेत. गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. सिंदफणा, मण़कर्णिका नदीलाही पूर आला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 69.7 मि.मी.इतक्या पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 63 पैकी 33 मंडळात अतिवृष्टी झाली आहे.


बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, अंबाजोगाई, केज, शिरूर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. या सातही तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. यात 6 जणांचा मृत्यू झाला असून,29 पशुधन दगावले आहे. तर 20 ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. याच बरोबर शहरी आणि ग्रामीण भागातील रस्ते वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी पूल वाहून गेले आहेत. तसेच बीड तालुक्यात शिवणी, खटकळी, लोकरवाडी, वडगाव भंडारवाडी, ईट, जुजगव्हाण, मन्यारवाडी, मणकर्णिका, तसेच विभागातील ३२ प्रकल्पही ओव्हरफ्लो झाले आहेत.


तलाव फुटून अनेक ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झाले असून शासनाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी, तसेच पीक विमा कंपन्यांनी तात्काळ विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Similar News