Solapur | पदवीधर तरुणाचा ३६५ दिवस अंडी देणाऱ्या कोंबडीचा यथस्वी प्रयोग

Update: 2025-12-20 11:15 GMT

सोलापूर | प्रतिनिधी

एकीकडे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होत असताना, तरुण मात्र उद्योग–व्यवसायात नवे प्रयोग करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील पदवीधर तरुण विशाल सूर्यवंशी यांनी शेतीला जोडधंदा म्हणून केलेल्या कुक्कुट पालन व्यवसायातून यश मिळवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी ब्लॅक ऑस्ट्रोलोप या दुर्मिळ व उच्च उत्पादक कोंबडीचे पालन सुरू केले आहे.

ब्लॅक ऑस्ट्रोलोप कोंबडीची खासियत म्हणजे ही कोंबडी कधीही खुडूक होत नाही. वर्षातील ३६५ दिवसांपैकी सुमारे ३२० दिवस नियमित अंडी देणारी ही प्रजाती मानली जाते. काळ्या रंगाची ही कोंबडी वजनालाही चांगली भरते. तसेच या प्रजातीचा कोंबडाही वजनाने भरदार होत असल्याने त्यांना बाजारात चांगला दर मिळतो.

सध्या थंडीच्या दिवसांमुळे या कोंबडीच्या अंड्याला प्रति नग सुमारे १५ रुपये दर मिळत असून, त्यामुळे हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. वाढती मागणी पाहता ब्लॅक ऑस्ट्रोलोप कोंबडीचे कुक्कुट पालन सोलापूर जिल्ह्यात वेगाने लोकप्रिय होत आहे.

विशाल सूर्यवंशी हे पदवीधर असून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केले. मात्र अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांनी शेतीपूरक व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. नियोजनबद्ध पद्धतीने कोंबडी पालन व्यवसाय सुरू करत आज त्यांनी लाखोंची वार्षिक उलाढाल साध्य केली आहे.

नोकरी नसली तरी कल्पकता, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवता येते, याचे जिवंत उदाहरण विशाल सूर्यवंशी ठरत आहेत.

Tags:    

Similar News