#GroundReport – धनदांडग्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींवर गंडांतर?

वाहतूक कोंडी कमी करण्याच्या नावाखाली धनदांडग्यांच्या जमिनी वाचवून शेतकऱ्यांच्या जमिनींचा बळी दिला असल्याचा गंभीर आरोप रायगड जिल्ह्यात झाला आहे. पाहा धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Update: 2021-02-23 14:58 GMT

पाली/रायगड : शेतकऱ्यांच्या जमिनी बिल्डरांनी लुबाडण्याच्या घटना आपण कायम वाचत असतो किंवा एखाद्या सरकारी प्रकल्पात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा संघर्षही पाहत असतो. महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थ क्षेत्रांपैकी प्रख्यात धार्मिक स्थळ व सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पालीमधील शेतकऱ्यांचा आपल्या जमिनी वाचवण्यासाठी असाच संघऱ्ष सुरू आहे. पालीमधील वाहतूक कोंडीचा तिढा सोडवण्यासाठी बायपास मार्गाचा पर्याय उभा केला जात आहे. मात्र नव्याने होणाऱ्या पाली झाप बलाप बायपासला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. या मार्गामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.



आपल्या मागण्यांसाठी काही नुकतेच पाली, झाप, बुरमाळी या गावांमधील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका बायपास मार्गाविरोधात आंदोलन केले होते. तसेच या रस्त्याच्या प्रक्रियेबाबत इथल्या शेतकऱ्यांनी एक गंभीर आक्षेप घेतला आहे. भूसंपादनाच्या या प्रक्रियेत धनदांडगे, राजकीय पुढारी, बडे उद्योजक यांना सोयीस्कररित्या अभय दिले जात आहे. तर गेल्या आअनेक पिढ्या शेतकरी ज्या जमिनी कसून उदर्निराह करत आहेत, त्या सुपीक जमिनींवर बुलडोजर फिरविण्याचा घाट प्रशासनाकडून घातला जात आहे, असा आरोप स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी केला आहे.

राज्य सरकारने 2010 मध्ये या रस्त्याला मान्यता दिली आहे. तसेच रस्त्यास 18 कोटी तर भूसंपादनासाठी 10 कोटींचा निधी देण्यासही मंजुर मिळाली होती. हा मार्ग पाली - पाटनुस राज्यमार्ग 94 ला जोडला जाणार आहे. पण या मार्गालगत येणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी नष्ट होणार असल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी दंड थोपटले आहेत. या आंदोलक शेतकऱ्यापैकी एक असलेल्या शेतकरी मंगेश कदम यांनी सांगितले की, सदर बायपास मार्गाकरिता यापूर्वी टाटा पॉवरची टॉवर लाईन गेलेल्या व शिक्कामोर्तब झालेल्या भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली आहे.



यापूर्वी मोजणी व सर्व्हे करण्यात आला होता. मात्र काही मोजक्या धनिक लोकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी सदर मार्ग वळविण्यात आला आहे. त्यामुळे हा डाव आम्ही उधळून लावू असा इशारा त्यांनी दिला. तसेच आणखी एक शेतकरी मिलिंद गोळे सांगतात की, आमच्या बापजाद्यांनी आजवर जपलेली आणि कसलेली शेतजमीन आम्ही प्राण गेला तरी देणार नाही, सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार केला नाही तर उग्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला आहे. रमेश लखीमळे यांनी सांगितले की, येथील शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती आहे. आमच्या अनेक पिढ्या शेतीवर जगल्या आहेत. आमची शेती नष्ट झाली तर आम्ही जगणार कसे, आमची मुले बाळे खाणार काय? शेती टिकली तरच शेतकरी जगेल, सरकारने आमच्या पोटावर कुऱ्हाड मारू नये, अशी विनंती लखीमळे यांनी केली.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंतांकडे माहिती घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तर देत दिली जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी यावेळी केला. शेतजमिनीत पोल उभे केले जात आहेत. नव्याने होणाऱ्या बाह्य वळण मार्गासाठी ज्या जमिनींचा वापर केला जाणार आहे त्या दुबार पिकी शेतजमिनी आहेत. पण या जमिनी देण्यास संबंधित जमीन मालक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवा आहे. यावर आता प्रशासन व सरकार यावर आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रशासनाचे म्हणणे काय?

यासंदर्भात पाली सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्याशी आम्ही संपर्क साधला तेव्हा, "पालीतील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी पाली झाप बलाप यामार्गे बाह्यवळण मार्ग निर्माण होत आहे. अशातच ज्या शेतकऱ्यांच्या जमीन भूसंपादन प्रक्रियेसंबंधी तक्रारी व अडचणी असतील त्यांनी तहसील कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभाग, पाली सुधागड यांच्याकडे तक्रारी सादर कराव्यात, त्यानुसार लवकरच संबंधित प्रशासन व शेतकरी यांच्यासमवेत बैठक लावली जाईल, व योग्य तोडगा काढला जाईल"

Full View
Tags:    

Similar News