कोण आहेत पंजाबचे नवीन मुख्यमंत्री चरणसिंह चन्नी?

Update: 2021-09-19 12:55 GMT

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज अखेर पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे.

कोण आहेत चरणसिंह चन्नी?

58 वर्षाचे चरणसिंह चन्नी पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री होणार आहेत. सध्या ते पंजाब सरकारमध्ये राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम पाहत आहेत. चरणसिंह चन्नी चमकौर साहिब मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत.

या संदर्भात हरीश रावत यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

चरणजीत सिंह चन्नी यांची पंजाबच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून सर्वानुमते निवड झाल्याची घोषणा करताना मला खूप आनंद होतो, असे पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी ट्विट केले.

सुखजिंदर सिंह रंधावा पंजाबचे पुढील मुख्यमंत्री असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीने पुढील मुख्यमंत्री म्हणून सुखजिंदर सिंह रंधावा यांचे नाव पुढे केले होते. मात्र, कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धू यांच्या भांडणामध्ये काँग्रेस हायकमांड ने पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांचं नाव घोषित केलं आहे.

चरणजीत सिंह चन्नीच का?

गेल्या काही दिवसांमध्ये भाजप शासित राज्यांमध्ये देखील मुख्यमंत्री बदलले जात आहेत. मात्र, या सर्व राज्यामध्ये दलित समाजाला उपमुख्यमंत्री पद दिलं जात आहे. मात्र, पंजाब मध्ये कॉंग्रेस ने मुख्यमंत्री पद देऊन मास्टर स्ट्रोक मारल्याचं बोललं जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह आणि नवज्योत सिंह सिद्धू यांच्या भांडणामध्ये दोघांच्याही कोणत्याही समर्थकाला मुख्यमंत्री पद दिलेलं नाही.

दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना मुख्यमंत्री केलं असते तर पंजाब कॉंग्रेस दोन गटात विभागली गेली असती. मात्र, चरणजीत सिंह चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिल्यानं पंजाब कॉंग्रेसची फुट टाळली जाऊ शकते. हा विचार ठेवून चन्नी यांना मुख्यमंत्री केलं असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान चरणजीत सिंह चन्नी हे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विरोधक मानले जातात. मात्र, इतर कोणत्याही व्यक्तीला मुख्यमंत्री पद दिलं असतं तर कॅप्टन यांचा विरोध राहिला असता. मात्र, चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री पद दिल्यानं त्यांचा विरोध मावळण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News