काँग्रेसला शिवसेनेने पुन्हा डिवचले, युपीएच्या नेतृत्वावरुन सामनामधून टीका

काँग्रेसमुळेच महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकले असे अशोक चव्हाण यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला सुनावून 24 तास उलटत नाही तोच शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे.

Update: 2020-12-29 02:45 GMT

युपीएचे नेतृत्व शरद पवार यांनी करावे अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडल्यानंतर काँग्रेसमधून यावर तीव्र आक्षेप घेण्यात आले होते. पण यानंतरही आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे. काय म्हटले आहे या अग्रलेखात ते थोडक्यात पाहूया,...

आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांनीही स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल. या विषयात इतरांनी पडू नये, असे काँग्रेस नेतृत्वास वाटते. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, असेदेखील त्यांचे नेते म्हणतात. आमचेही त्याबाबत वेगळे मत नाही. मोठ्या पक्षाच्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा

पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरू झाले आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. यूपीए भक्कम करावी व भाजपसमोर आव्हान उभे करावे, हा मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष हे सर्व घडवून आणण्यास समर्थ असेल तर त्यांचे स्वागत आहे. आघाडीतील सर्वात मोठय़ा पक्षाकडेच आघाडीचे नेतृत्व असते, असे काँग्रेसचे नेते हरीश रावत म्हणतात. ते योग्य तेच बोलले आहेत, पण या मोठय़ा पक्षाने जमिनीवर चालू नये. मोठी झेप घ्यावी, अशी सगळय़ांची अपेक्षा आहे. काँग्रेस आजमितीस नक्कीच मोठा पक्ष आहे. पण मोठा म्हणजे नक्की काय आकारमानाचा? काँग्रेसच्या खालोखाल तृणमूल, अण्णा द्रमुक असे पक्ष संसदेत आहेत व हे सर्व भाजप विरोधक आहेत. देशातील विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे व विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंडय़ाखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा? देशात भाजपविरोधात असंतोषाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांना बदल हवाच आहे. त्याप्रमाणे पर्यायी नेतृत्वाची गरज आहे. ते कोण देऊ शकेल हा प्रश्न आहे. काँग्रेस मोठा पक्ष आहेच. स्वातंत्र्य लढय़ात, स्वातंत्र्यानंतर देश घडविण्यात काँग्रेसचे योगदान मोठे आहे, पण तेव्हा काँग्रेसला समोर पर्याय नव्हता. विरोधी पक्षही तोळामासाचा होता. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासारख्या लोकप्रिय नेतृत्वाने देश भारावलेला होता. काँग्रेसने दगड उभा केला, तरी लोक भरभरून मतदान करीत होते. काँग्रेसविरोधात बोलणे हा त्या काळात अपराध ठरविला जात होता. काँग्रेसला दलित, मुसलमान, ओबीसींचा भक्कम पाठिंबा होता.

शिवसेनेतर्फे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर टीका करण्यात येत आहे, काँग्रेसनेही यावरुन नाराजी व्यक्त केली असताना वारंवार काँग्रेसला का डिवचले जात आहे असा सवाल उपस्थित होतो आहे.

Tags:    

Similar News