OBC आरक्षण : खडसेंची सून आणि मुलगी आमनेसामने

Update: 2021-06-24 12:59 GMT

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या शाब्दीक चकमकी रंगल्या आहेत. पण आता भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या घरातही ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन नणंद- भावजय यांच्यात शाब्दीक सामना रंगला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खुल्या वर्गातून भाजपतर्फे सर्व ओबीसी उमेदवारांना तिकीट देऊ अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसें यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही. या शब्दात त्यांनी टीका केली आहे. रक्षा खडसेंचे रोहिणी खडसेंना उत्तर

रोहिणी खडसे यांच्या या टीकेला एकनाथ खडसेंच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनीही जोरदार उत्तर दिलं आहे. रोहिणी खडसें ह्या सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत. त्यांच्या पक्षाने त्यांना सांगितलं आहे, तसे त्या बोलत आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. राजकारण बाजूला ठेऊन सत्ताधारी पक्षाने ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असंही रक्षा खडसें यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत, सत्ताधारी पक्षाचे प्रमुख आहेत. ओबीसी समाजाची दिशाभूल न करता त्यांनी राज्य सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडल पाहिजे असंही रक्षा खडसेंनी म्हटलं आहे. ओबीसी समाजाच्या हक्कासाठी भाजप 26 तारखेला आंदोलन करणार आहेत. याबाबत त्यांच्याशी बातचीत केलीय, आमचे प्रतिनिधी संतोष सोनवणे यांनी

Tags:    

Similar News