लोकसभेत विरोधी पक्षाचा गटनेता निलंबित

Update: 2023-08-10 14:18 GMT

विरोधी पक्षाने मांडलेला अविश्वास प्रस्ताव लोकसभेत फेटाळण्यात आला. मात्र, विरोधी पक्षाच्या गटनेत्याला निलंबित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित करीत सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. त्यावर गेल्या तीन दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याच्या प्रस्ताव मांडण्यात आला. तो प्रस्ताव लोकसभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या गटनेत्यालाच निलंबित केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

यावेळी लोकसभा अध्यक्षांनी भाजप खासदार वीरेंद्र सिंह मस्त आणि काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी गैरवर्तन केल्याचे म्हटले. त्यानंतर मी माझ्या सर्वोच्च नेत्याबद्दल केलेलं वक्तव्य सहन करू शकलो नाही. त्यामुळे माझा संयम सुटला, असं भाजप खासदार वीरेंद्र सिंह मस्त यांनी म्हटले. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांनी वारंवार सभागृहात गैरवर्तन केल्याचे म्हटले. तसेच पंतप्रधान मोदी आणि इतर मंत्र्यांच्या भाषणा दरम्यानही गैरवर्तन केले. हे सभागृहाची गरिमा कमी करणारे आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात यावे. कारण त्यांना चूक लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी माफी मागितली नाही, असं म्हणत प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे गटनेते निलंबित झाले आहेत.

Tags:    

Similar News