ठरलं तर ! पुढच्या आठवड्यात विरोधी पक्षनेत्याची निवड

Update: 2023-07-28 14:45 GMT

अजित पवार महायुतीत सामील झाल्यानंतर विधानसभेतलं विरोधी पक्षनेते पद रिक्तच होतं. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा संपत आला तरी अद्याप विरोधी पक्षांना विरोधी पक्षाचा नेता ठरवता आलेला नव्हता. मात्र, आता काँग्रेसच्या नेत्यांची वायबी सेंटर इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली, त्यात विरोधी पक्षनेते पदाचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झालीय. पुढच्याच आठवड्यात विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय.

सध्या विधीमंडळात शिवसेनेचे १५, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडे १५ ते २० आमदार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत सर्वाधिक आमदार हे काँग्रेसकडे आहेत. त्यामुळं काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होऊ शकतो. मात्र, काँग्रेसनं अजूनही या पदासाठीच्या नेत्याची निवड केलेली नाही. दरम्यान, आज झालेल्या बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांना माहिती देतांना सांगितलं की, विधानसभेचा विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा असेल आणि लवकरच त्याच्या नावाची घोषणा करून शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.

विधीमंडळाची एक व्यवस्था असते. त्या व्यवस्थेनुसार ज्या पक्षाचे विधानसभेत सर्वाधिक आमदार असतात, त्या पक्षाचा आमदार विरोधी पक्षनेता होतो. सध्या विधानसभेत काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल. पुढच्या आठवड्यात तुम्हाला विरोधी पक्षांचा नेता पाहायला मिळेल, असं सांगत नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेतेपदाविषयीचा संशय दूर केलाय.

Tags:    

Similar News