भाजप नेत्यांचे भूखंड घोटाळे काढणार, खडसेंची गर्जना

दसऱ्याच्या एक दिवसआधी सीमोल्लंघन करत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या प्रवेशावेळी त्यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.

Update: 2020-10-23 11:29 GMT

भाजपला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे यांनी यापुढे भाजप नेत्यांचे भूखंड घोटाळे बाहेर काढण्याची गर्जना करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना एकनाथ खडसे भावूक झाले होते. जळगाव जिल्ह्यात भाजपपेक्षा राष्ट्रवादीचा मोठा विस्तार करण्याचा शब्द आपल्याला देतो असे खडसे यांनी यावेळी शरद पवार यांना सांगितले. 

भाजपमध्ये आपल्याला जाणूनबुजून टार्गेट केले गेले. रोहीणी खडसेंना मी तिकीट मागितले नाही तरीही त्यांना दिले, असेही खडसे यांनी सांगितले. आपले अनेक समर्थक राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. पण काहींना टेक्निकल गोष्टींमुळे थेट प्रवेश घेता येत नाही. पण वर्षभराच्या आत नक्कीच बदल दिसेल. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तांतर करु दाखवेन असे एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले.

"विनाकारण आपल्यामागे अँटीकरप्शनचा ससेमिरा लावण्यात आला, भूखंडाची चौकशी लावली गेली, पण थोडे दिवस जाऊ द्या भूखंडांचे विषय आणतो" असे सांगत एकनाथ खडसेंनी एकप्रकारे भाजपला आव्हान दिले आहे. "मी गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात आहे. पण कधीही कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. तोंडावर गोड बोलायचं, ज्येष्ठ म्हणायचं आणि खंजीर खुपसायचा हे मी कधीही केलं नाही. ४० वर्षांच्या सेवेच्या बदल्यात मला पक्षाने काय दिलं ?मी पक्ष सोडावा अशी कार्यकर्त्यांची भावना होती. " असेही खडसेंनी यावेळी सांगितले.

Tags:    

Similar News