ये फेविकॉल का जोड है टुटेगा नहीं, फडणवीस यांच्या नाराजीच्या चर्चेदरम्यान एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पॉप्युलर असल्याची जाहिरात प्रसिध्द झाल्याने देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Update: 2023-06-15 11:35 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त पॉप्युलर असल्याची जाहिरात दिल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह दुसऱ्या दिवशी दुसरी जाहिरात प्रसिध्द करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिली जाहिरात प्रसिध्द केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचे कार्यक्रम रद्द केल्याचे दिसून आले.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने कानदुखीचे कारण दिले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस कोल्हापूर येथील सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाला न गेल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच मंचावर आले.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना आपल्या गाडीतून येण्यातून येण्यासाठी आग्रह केला. मात्र त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मी मागून येतो, असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं टाळलं. यानंतर पालघर येथील कार्यक्रमाच्या ठिकाणीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांशी बातचीत केली नाही.

या घडामोडीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझी आणि देवेंद्रजींची जोडी जीवाभावाची आहे. ये फेविकॉल का जोड है टुटेगा नहीं, असं म्हणत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस हे सुध्दा हसल्याचे पहायला मिळाले.

Tags:    

Similar News