फोन टॅपिंग – नाना पटोलेंच्या आरोपांवर काँग्रेसचे स्पष्टीकरण

Update: 2021-07-13 12:13 GMT

मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आपले फोन टॅपिंग करण्याचे आदेश दिले असून आपल्या हालचालींवर लक्ष ठेवल जाते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. नाना पटोले यांनी आपल्याच सरकारवर हा आरोप केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या तीन पक्षांमध्येच ताळमेळ नाही, या पक्षांचा एकमेकांवर विश्वास नाही, अशा स्वरुपाची चर्चा सुरू झाली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर आता नाना पटोले यांच्या विधानावर आता काँग्रेस पक्षातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याने अडचणीत आलेल्या काँग्रेसने आता याचे खापर मीडियावरच फोडले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाची माध्यमांनी मोडतोड करुन ते दाखवण्यात आल्याने गैरसमज निर्माण झाले. त्यांना काय म्हणायचे होते याचा खुलासाही त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्याचा रोख केंद्र सरकारकडे होता असेही त्यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे हा विषय आता संपला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांनी दिली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली, त्यानंतर जिल्हाध्यक्ष, आमदार व पदाधिका-यांची ऑनलाईन बैठक झाली.

यानंतर एच.के.पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली, यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील उपस्थित होते. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत असलेला डाटा देण्यास केंद्र सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. या डाटाचा उपयोग केंद्र सरकारच्या योजना राबवण्यासाठी केला जात असताना तोच डाटा कोर्टात सादर का केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित करून ओबीसींच्या हितासाठी तो डाटा जसा आहे तसा केंद्र सरकारने तात्काळ जाहीर करावा, अशी प्रदेश काँग्रेसची मागणी आहे, असे एच. के. पाटील यांनी यावेळ सांगितले.

विधानसभा अध्यक्षपदावरून कसलाही वाद नाही, ठरल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाकडेच अध्यक्षपद आहे आणि ते काँग्रेसकडेच राहिल. आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांनीही तसे स्पष्ट केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात कोविडमुळे अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही परंतु लवकरच ही निवडणूक पार पडेल, असे पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

Tags:    

Similar News