OBC आरक्षण : महामोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारली

Update: 2021-07-22 06:06 GMT

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार सहभागी होणार असलेल्या बारामतीमधील ओबीसी मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. बारामतीत २९ तारखेला ओबीसी एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार होते. दरम्यान आता मोर्चाला परवानगी नाकारल्याने हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्याने बारामतीमध्ये राज्यातील पहिला ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात येणार होता. आरक्षण कृती समितीने हा मोर्चा काढण्याचा निर्णय़ घेतला होता. पण बारामती शहर पोलीसांनी या मोर्चाची परवानगी नाकारली आहे.

या मोर्चाला नाना पटोले, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, राम शिंदे,पंकजा मुंडे,योगेश टिळेकर, इम्तियाज जलील, हे सर्व नेते उपस्थित राहतील अशी माहिती देण्यात आली होती.

पोलिसांनी परवानगी का नाकारली?

बारामतीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी यासंदर्भात आयोजकांना

कलम १४९ नुसार नोटीस बजावली आहे.

शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या मोर्चाला काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असल्याने महाविकास आघाडीत वाद निर्माण झाल्याचीही चर्चा होती. पण नाना पटोले यांनी आपण मोर्चामध्ये सहभागी होणारच असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आल्याने आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

Tags:    

Similar News