शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी शरद पवार मैदानात...

शेतकरी कायद्याला पाठींबा देण्यासाठी भव्य मोर्चा, शरद पवारांसह कोणकोणते नेते होणार सहभागी?

Update: 2021-01-25 04:46 GMT

गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार मधील नेते आज राजभवनावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चा मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत.

या मोर्चाचं आयोजन भारतीय किसान सभेने केले आहे. या मोर्चाला 20 हजारांपेक्षा अधिक शेतकरी सहभागी होण्याची शक्यता आहे.

कोणत्या संघटना होणार सहभागी?

अखिल भारतीय किसान सभा, सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डी.वाय.एफ.आय. ही युवक संघटना व एस.एफ.आय. ही विद्यार्थी संघटना महाराष्ट्रभरातील शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थ्यी या मार्चमध्ये सामील होणार असल्याचं किसान सभेने म्हटलं आहे.

सभेने होणार मोर्चाला सुरुवात…

25 जानेवारी ला आझाद मैदान येथे सकाळी 11 वाजता प्रचंड सभा होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील.

सभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी 2 वाजता राज भवनाकडे कूच करतील व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आंदोलनात करण्यात येणार आहेत.

अशी होणार सांगता…

26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन आणि शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामाची सांगता होईल.

Tags:    

Similar News